स्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा सोमवारी दि. २३ रोजी कोरमअभावी तहकूब करावी लागली. शासनाने १४४ कलम लागू केले असून त्याला प्रतिसाद म्हणून अनेक सदस्य सभेला गैरहजर राहिले. त्यामुळे सभा तहकूब करावी लागली, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी दली.
मार्च महिना पूर्ण होण्यापूर्वी जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मांडला जातो. त्यामुळे १५ दिवसांपूर्वीच सर्व सदस्यांना अर्थसंकल्पीय सभेची सूचना देण्यात आली होती.
सोमवारी ( दि २३) दुपारी एक वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सभेसाठी सर्व सदस्यांनी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, सध्या कोरोना विषाणूचा विळखा वाढत आहे. मुंबई, पुण्यासह राज्याच्या अन्य भागांत विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शासनाने रविवारी (दि. २२) राज्यात १४४ कलम लागू केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सर्वच सदस्यांनी सभेला दांडी मारली. दरम्यान, दुपारी एक वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे, उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि सभापती वगळता इतर सदस्य हजर नव्हते. सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ५४ सदस्य आहेत. यापैकी किमान दोन तृतीयांश सदस्य सभेला उपस्थित असणे गरजेचे होते; मात्र बहुतांश सदस्यांनी दांडी मारल्याने अखेर अध्यक्षांना सभा तहकूब करावी लागली. दरम्यान, आता अर्थसंकल्पाला मंजुरी मिळावी, यासाठी हा अर्थसंकल्प शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

 
Top