उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 बळीराजा चेतना अभियानातील सव्वासहा कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता. दोन) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जागर-गोंधळ  आंदोलन करीत परिसर दणाणून सोडला. घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता शेतकरी संघटनाही आंदोलनात उतरली असून अधिका-यावर गुन्हे दाखल करा, अन्यथा या प्रकरणाची कागदपत्र दाखवा, असे म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.आत्महत्याग्रस्त जिल्हयातील शेतक-यांच्या टाळूवरील लोणी खाणा-या प्रशासनाला जरब बसविण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन असल्याचे मानले जात आहे.
बळीराजा चेतना अभियानात जिल्ह्यातील शेतक-यांना तब्बल सव्वा सहा कोटी रुपयांची पुस्तके वाटप केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. त्यासाठी संबंधीत ठेकेदाराला निधीही वर्ग केला आहे. प्रत्यक्षात शेतक-यांना पुस्तकेच मिळाली नाहीत. बळीराजा चेतना अभियानातील पुस्तक वाटपाची अधिकृत कागदपत्र दाखवावित, पुस्तकांची खरेदी कशी झाली, निविदा कशा पद्धतीने काढण्यात आली. पुरसे मनुष्यबळ नसताना अशी योजना जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील विभागाकडून कशासाठी राबविली, जिल्ह्यात पुस्तके आल्यानंतर कोणत्या अधिका-याने तपासली, कोणत्या तालुक्यात किती पुस्तके वाटली, शेतक-यांना पुस्तके वाटप करीत असतानाचे छायाचित्र, अभियानाची व्यापक प्रमाणात केलेली प्रसिद्धी आदी प्रकारची माहिती अधिका-यांनी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 
Top