आरोग्य आणि पोलीस प्रशासनाबद्दलकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटाला घराच्या खिडकीत, छतावर जावून टाळ्या वाजविल्या. 
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 कोरोनामुळे देशात राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना करूनही कोरोना आटोक्यात येत नाही. त्यामुळे लोकांनीच कोरोना संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. या कर्फ्यूला जिल्ह्यातील सर्व शहर व ग्रामीण भागातील जनतेने अभुतपूर्व प्रतिसाद दिला. कधी नव्हे, तो जिल्हा इतका शांत आणि सामसूम दिसून आला. सर्व रस्ते निर्मनुष्य, व्यवहार ठप्प, दळणवळणाच्या सेवा, सुविधा ठप्प होत्या. सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत नागरिकांनी घरातच बसून कोरोना संपविण्याची प्रार्थना केली. रूग्णांची तपासणी, संशयितांच्या वेगवेगळ्या तपासण्या व त्याअनुषंगिक कामे पार पाडण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणार्‍या आरोग्य आणि पोलीस प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटाला घराच्या खिडकीत, छतावर जावून टाळ्या वाजविल्या. 
उस्मानाबाद जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रूग्ण नाही. पुणे, मुंबई व अन्य ठिकाणी नोकरी, व्यवसायानिमित्त गेलेले हजारो कुटुंबिय गावाकडे परतू लागले आहेत. त्यांच्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी बसस्थानकावर व रेल्वे स्थानकावरच आरोग्य तपासणी केली जात होती. शनिवारी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मध्यरात्रीपासून सर्व रेल्वेगाड्या बंद केल्या आहेत. त्याचबरोबर राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसगाड्याही बंद ठेवल्या. कोरोना पसरू नये, यासाठी रेल्वे आणि बससेवा या प्रमुख प्रवासी सेवा बंद केल्याने अनेकांची जशी गैरसोय झाली, तशीच या सेवेला तोटाही सहन करावा लागला आहे. कोट्यवधी रूपयांच्या उत्पन्नाला फटका बसला तरी नागरिकांच्या आरोग्याचा महत्वाचा प्रश्न रेल्वे व एसटी महामंडळाने गांभीर्याने घेतला होता. त्यामुळे रेल्वेस्थानकावर एकही रेल्वे आली नाही, त्याचबरोबर शहर व ग्रामीण भागातील रस्त्यावर एसटी महामंडळाची बसगाडी धावली नाही. सर्व गाड्या आगारात उभ्या करून कर्मचार्‍यांनी घरीच दिवस घालवला. 
जिल्ह्यात कोरोना संदर्भात संशयित म्हणून आढळून आलेल्या 476 जणांना ‘क्वारन्टाईन’ करण्यात आले आहे. यापैकी उस्मानाबाद, उमरगा, तुळजापूर येथील 27 जणांना दवाखान्यात तर उर्वरित रुग्णांना होम ‘क्वारन्टाईन’ करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील एकही रुग्णाला अद्याप कोरोनाची लागण झाली नाही. आतापर्यंत 19 जणांचे ‘स्वॅब’ पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्यापैकी चार जणांचे तपासणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा, नगरपालिका रात्रंदिवस झटत आहेत. याच पार्श्वभूमीवर या विषाणूचा संसर्ग होऊ नये याकरीता शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस ‘शटडाऊन’ही जाहीर करण्यात आला. याला प्रतिसाद देत व्यापारी, व्यावसायिकांनी आपआपली दुकाने बंद ठेवलेली होती. प्रशासनाने बाहेरून येणार्‍या नागरिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील या भागात विविध कारणास्तव वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांनी गावाकडचा रस्ता धरल्याने अडचणीत वाढ झाली आहे. परंतु, अशा नागरिकांनीही आवश्यक ती काळजी घ्यावी, आरोग्य तपासणी करावी, पंधरा दिवस घरात अथवा शासकीय यंत्रणेच्या विलगीकरण केंद्रात स्वत:ला वेगळे ठेवावे यासाठी प्रयत्न होत आहेत. दुसरीकडे हा संसर्ग फेलावाच्या तिसर्‍या आणि धोकादायक स्टेजमध्ये असल्याने प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी गर्दीच्या ठिकाणांवर कार्यक्रमास बंदी घालण्यात आलेली आहे. 
प्रवासी सेवा बंद झाल्याने गर्दीला लगाम
उस्मानाबाद जिल्ह्यातील लाखो नागरिक उदरनिर्वाहाकरीता पुणे, पिंपरी चिंचवड या शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यातील हजारो नागरिकांनी आपापल्या गावाकडे कुच केली आहे. यामुळे जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण नसला तरी या गर्दीमुळे धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनीही केलेल्या आवाहनानुसार घरीच थांबून तसेच बाहेरून आलेल्या नागरिकांनीही आपापल्या गावात परिसरात आपली तपासणी करून नोंदणी करण्याचे व स्वत:ला इतरांपासून दहा ते पंधरा दिवस वेगळे ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी संपूर्ण दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. या अनुशंगाने सर्व प्रवासी वाहतूक बंद असल्याने कोणालाही कुठेही प्रवास करता आला नाही.
 
Top