उस्मानाबाद/ प्रतिनिधी -
महाराष्ट्रात वारक-यांचे संघटन तयार झाल्यापासून अनेक चुकीचे निर्णय रद्द झाले असून, महाराष्ट्रातील गोवंश हत्याबंदीसारखा कायदा वारक-यांच्या आंदोलनामुळेच अंमलात आला, असे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज यांनी केले. वारकरी मंडळाच्या उस्मानाबाद जिल्हा शाखेचा मेळावा आणि जिल्ह्यातील पदाधिका-यांना नियुक्तीपत्र प्रदान सोहळा रविवारी (दि. 8) शहरातील यशराज मंगल कार्यालयात घेण्यात आला. या वेळी बोधले महाराज बोलत होते.
या कार्यक्रमासाठी वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष हभप सुधाकर महाराज इंगळे, प्रदेश सचिव अण्णासाहेब महाराज बोधले, पुणे विभागीय अध्यक्ष आनंद महाराज तांबे, लातूरचे जिल्हाध्यक्ष लालासाहेब देशमुख, औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चनगटे शास्त्री, उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष अॅड.दिगंबर खोत, सचिव सरोजिनी पाटील, हभप बोधले महाराज म्हणाले, वारकऱ्यांच्या संघटनेची पार्श्वभूमी अनेक वर्षे जुनी आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, या उक्तीनुसार संघटनेची सुरुवात आहे.काहीजणांनी वारकऱ्यांना संघटनेची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, वारक-यांचे संघटन ही काळाची गरज असून, या संघटनेमार्फत एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते. संघटनेमुळेच शासनाने वारकरी सांप्रदायाला अनुकुल असे अनेक निर्णय घेतले आहेत. पुढच्या काळात हे संघटन अधिक मजबूत होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तसेच तालुकास्तरावरही मेळावे घेण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी वारकरी मंडळाच्या भविष्यातील उपक्रमाची रूपरेषा मांडली.यावेळी मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिका-यांना शुभेच्छा दिल्या. वारकरी मंडळाच्या राज्य समिती, जिल्हा,तालुका, तसेच शहर समिती पदाधिका-यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अॅड. खोत यांनी केले. सूत्रसंचालन हभप भारत महाराज कोकाटे यांनी केले. अॅड.रत्नदीप (बंडू) पाटील, चव्हाण, मगर यांच्यासह वारकरी मंडळाच्या पदाधिका-यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. चित्रकार राजकुमार कुंभार यांनी सुबक रांगोळीतून वारक-यांची प्रतिमा साकारली होती. कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी, सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मारुती मंदिरापासून वारकरी दिंडी काढण्यात आली. दिंडीचे उद्घाटन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
वारकरी संमेलन
मान्यवरांच्या हस्ते मंडळाच्या पदाधिका-यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज यांनी उस्मानाबादेत लवकरच तीन दिवसीय वारकरी संमेलन भरवण्यात येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, या तीन दिवसांच्या वारकरी संमेलनात देशभरातील वारकरी सहभागी होतील, असे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी उस्मानाबादकरांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
 
Top