उमरगा/प्रतिनिधी-
तालुक्यातील थोरलीवाडी येथे गावठी दारूच्या अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने मंगळवारी (दि.10) पहाटेच्या सुमारास अचानक छापा टाकून गावठी दारूचा अवैध अड्डा उद्ध्वस्त केला. या छाप्यात सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून, सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुलिवंदन, होळी व रंगपंचमी सणाच्या पाश्र्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी अवैध व्यावसायिकांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. थोरलीवाडी येथील गावालगत असलेल्या एका ठिकाणी गावठी दारूचा अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी पहाटेच्या सुमारास पोलीस निरीक्षक माधवराव गुंडिले, सहायक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर गोरे, पोलिस उपनिरीक्षक विजय वाघ, पोलिस नाईक मिलिंद साखळे, पोकॉ संजीवन शिंदे, महिला पोलिसनाईक आम्रपाली पाटील, सारिका कदम, उत्कर्ष चव्हाण, सचिन पाटील, अक्षय गांधले यांच्यासह 20 ते 25 पोलिस कर्मचा-यांचा फौजफाटा थोरलीवाडी येथे दाखल होत घरातील झाकून ठेवलेले व उघड्यावर असलेले गुळ मिश्रीत रसायनासह गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयावर छापा टाकला. या छाप्यात दोनशे लिटर क्षमतेच्या 14 प्लास्टिक बॅरलमध्ये गुळ मिश्रित अंदाजे अडीच हजार लीटर रसायण ज्याची किंमत एक लाख 26 हजार रुपये तयार केलेली गावठी दारू शंभर लिटर ज्याची किंमत सहा हजार रुपये, 20 गुळाचे डाग असा दोन हजार सहाशे लिटर रसायन व दारू असे एकूण एक लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. काही शॅम्पल सीए तपासणीसाठी पाठवून उर्वरित दारू, रसायन पंचासमक्ष जाग्यावर नष्ट करून अवैध गावठी दारू बनविण्यात येणारा अड्डा उद्ध्वस्त केला. मंगळवारी पहाटे अवैध दारूवरील कारवाईमुळे विक्री करणा-याचे धाबे दणाणले आहेत. यापूर्वी पळसगांव तांडा येथे दोन वेळा पोलिसांच्या पथकाने धडक अशी कारवाई करून पावणे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता. मंगळवारी थोरलीवाडी येथे करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी यशवंत खवडे, रायप्पा कोराळे, लक्ष्मण मिसाले, विठ्ठलराव पाटील, त्र्यंबक खवडे व दत्तू खवडे या सहा जणाना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सोमवारी (दि.9) सायंकाळी तालुक्यातील गुंजोटी, कराळी, बिरुदेव मंदिर परिसरासह शहरात अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई करीत विठ्ठल थोरात, बाबू मोरे, श्रीकांत मंडले, काशीनाथ मंडले, संतोष तेलंग यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करीत सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 
Top