लोकप्रतिनिधी समोरच हेवेदावे
उमरगा/प्रतिनिधी-
सध्या जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना या आजारामुळे जनमानसात कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे व याचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात दिसून येत आहे. यासंदर्भात उमरगा लोहारा तालुक्यातील सद्यस्थिती व त्यावर उपायोजना आखणे याबाबतचा आढावा आ. ज्ञानराज चौगुले यांनी प्रशासनातील सर्वच विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी कोरोना, प्रतिबंधात्मक उपायाऐवजी शहरात वाढलेला डुकरांचा उच्छाद व अतिक्रमणावर अधिका-यांचे तु-तु, मैं-मैं झाले.
आमदार ज्ञानराज चौगुले याच्या अध्यक्षतेखाली उमरगा तहसील कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी (दि 19) रोजी आयोजित बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार चौगुले यांनी सध्या मुंबई ,पुणे व इतर मोठ्या शहरातून येणाऱ्या प्रवाशांची प्राथमिक तपासणी बसस्थानक परिसरात तात्पुरते आरोग्य विभाग सुरू करून करावी व संशयित असल्यास त्याच्यावर 14 दिवस निगराणी ठेवावी तसेच गावात मोठ्या शहरातून आलेल्यांची ग्रामपंचायतने नोंदी घेवून त्याची माहिती आरोग्य विभागाला देण्याचेही अधिकाऱ्यांना सूचित केले. शाळा, कॉलेज येथेही परीक्षेच्या वेळी निर्जंतुक फवारणी करावी,त्याच बरोबर शहरात दररोज साफसफाई, स्वच्छता, निर्जुतुक फवारणी करण्याचे निर्देश उमरगा, मुरूम व लोहारा येथील मुख्याधिका-यांना दिले. तसेच विदेशातून आलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच केरोनासबंधी सोशल मीडियावरून वेगवेगळ्या अफवा पसरविला जात आहेत जे कोणी हे कृत्य करेल त्यावर तात्काळ गुन्हा नोंद करावा असे आदेशही उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांना आमदार चौगुले यांनी यावेळी दिले.
बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, तहसीलदार संजय पवार, तहसीलदार विजय अवधाने, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडित पुरी, अधिक्षक डॉ.वसंत बाबरे, अधिक्षक डॉ. आर. व्ही. सूर्यवंशी, उमरगा मुख्याधिकारी प्रकाश पाटील, मुख्याधिकारी डॉ.आर. व्ही. सूर्यवंशी, गटविकास अधिकारी डॉ.अनिल कदम, आगार व्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी, डॉ. आर. बी. जोशी, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, आय.एम.ए. संघटनेचे सचिव डॉ प्रशांत मोरे, डॉ.उदय मोरे, व्यापारी महासंघाचे नितीन होळे, हरीप्रसाद चांडक आदी उपस्थित होते
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उमरगा बसस्थानकावर मेडीकल कॅप लावल्याचे डॉ. पंडित पुरी यांनी सांगुन दोन पोलीस द्यावेत व पालिकेने डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. पालिकेने मात्र संबंधित डुकराच्या मालकावर कारवाई करावी असे सांगून पोलिसांकडे बोट केले तर शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी पालिका कांहीच करीत नसल्याचा मुद्दा उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी लावून धरला. तेंव्हा पालिकेच्या मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी पोलीस सहकार्य करीत नसल्याने कोणतेही काम होत नसल्याची ओरड केली. त्या वेळी पोलीस निरीक्षक माधवराव गुंडीले यांनी एकटी पोलीस कांही करू शकत नाहीत. पालिकेच्या वतीने अतिक्रमण हटविण्याची यंत्रणा उभी करा. संरक्षण देण्याचे काम पोलीस करतील असे सांगितले. एकंदरीत कोरोना आजाराच्या संदर्भात ही बोलाविण्यात आलेली बैठकीत कोरोनावरीव प्रतिबंधात्मक उपायाऐवजी शहरात वाढलेला डुकरांचा उच्छाद व अतिक्रमणावर अधिका-यांचे तु-तु, मैं-मैं झाले.
 
Top