उस्मानाबाद/प्रतिनिधी -
93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात योगदान देणाऱ्या वेगवेगळ्या कमिटीच्या सदस्यांना तसेच शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
मराठी राजभाषा दिनानिमित्त साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयात गुरूवारी (दि.27) सायंकाळी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, मसाप शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष मकरंदराजे म्हणाले, 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला विविध क्षेत्रातील मंडळींनी सहकार्य केले. त्यामुळे संमेलन मोठ्या दिमाखात पार पडले. त्यानंतर राजकीय संमेलनाचा विचार पुढे आला. वास्तविक पाहता 93 व्या संमेलनाला विरोध म्हणून किंवा प्रतिक्रिया म्हणून हे संमेलन घेतले जाणार नाही तर महाराष्ट्राला सकारात्मक विचार देण्यासाठी राजकीय संमेलन घेतले जाईल. प्रतिक्रिया वाटू नये, यासाठीच काही ज्येष्ठ मान्यवरांच्या सांगण्यावरून राजकीय संमेलनासाठी आपण काही दिवस थांबलो आहोत. मे किंवा जून महिन्यात हे संमेलन घेतले जाईल. अर्थातच त्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व साहित्यिकांचे सहकार्य घेतले जाईल. सगळ्यांच्या प्रयत्नातून हा नवा विचार महाराष्ट्रात जाईल.
दरम्यान,मराठवाडा साहित्य परिषदेचे शाखाध्यक्ष नितीन तावडे यांनीही या संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. ते म्हणाले, नगराध्यक्ष मकरंदराजे आणि जिल्ह्यातील राजकीय मंडळींच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या साहित्य संमेलनात आम्ही देखील हिरीरीने सहभागी होऊ.
तत्पूर्वी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कांबळे यांनी विचार मांडले. मराठी राजभाषा दिनासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, मराठी भाषेसंबंधी केवळ एक दिवसापुरता नव्हे तर वर्षभर विचार केला गेला पाहिजे. मातृभाषा म्हणजे मुल उदरात असताना आई उच्चारते ती भाषा. अशा मातृभाषेचे संस्कार आपल्या मनामनावर रूजले आणि वाढले पाहिजेत. मराठी भाषा हा विचार आहे. हा विचार प्रत्येकाने जोपासण्याची गरज आहे. जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाविषयी उस्मानाबादकरांचे कौतुक केले. यावेळी संमेलनात सहकार्य करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अरविंद हंगरकर यांनी केले. आभार उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी शहरातील ज्येष्ठ साहित्यिक, महिला,विविध क्षेत्रातील मान्यवर, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top