उस्मानाबाद/प्रतिनिधी-
देशात कांदा महागला म्हणून केंद्र सरकारने इजिप्तमधून कांदा आयात केला. मूठभर लोकांसाठी सरकार भूमिका बदलत राहते. मात्र, देशातील बहुसंख्य शेतक-यांचा विचार केला जात नाही. हे केवळ तुमच्या-आमच्या डोक्यात जाती-धर्माचे विष कालवल्यामुळे घडत आहे. प्रत्येकाने आजपासून धर्माचा रंग डोक्यातून काढून टाकावा, शेतकरी हितासाठी शेतकरी हाच धर्म पाळावा, असे कळकळीचे आवाहन प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले.
शिवजयंतीनिमित्त शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जात आणि धर्म पाहीला नव्हता. त्यांचा लढा अन्यायाविरूध्द होता. न्याय-अन्यायाच्या लढाईला आपण हिंदू-मुस्लिमांची लढाई मानू लागलो. आपल्या डोक्यात चुकीचे विचार घुसल्यामुळे देशाचा विकास खुंटत चालला आहे. प्रतापगडाच्या रणसंग्रामावेळी शिवाजी महाराजांच्या बाजूने पठाणांची फौज उभी होती. अनेक मुस्लिम सरदार, सैन्य शिवरायांच्या दलामध्ये असताना चुकीच्या कल्पना आपण रंगवत आहोत, याचा विचार करायला हवा. एका दाण्यापासून हजारो दाणे बनविणारा शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर अजूनही दरिद्रीमुळे आत्महत्या करत आहे. त्याच्या कुटुंबात आजारी व्यक्तींवर उपचार करण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत. शेतक-याच्या शेतमालाला भाव मिळत नाही. भाववाढ झाली तर मीडियावाले ओरड सुरू करतात. शहरी भागातल्या लोकांसाठी शासन शेतमालाच्या वाढत्या किंमती नियंत्रणात आणते. शासनाला शहरी लोकांचा कळवळा आहे. मात्र, सिमेंट, लोखंडांसारख्या वस्तूंचे भाव वाढल्यास का ओरड होत नाही. ही भाववाढ रोखण्याची हिंमत सरकार का दाखवत नाही, असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारी कर्मचा-यांसाठी तातडीने सातवा वेतन आयोग लागू झाला. 19 लाख कर्मचा-यांपुढे शासनाला झुकावे लागते. मात्र, 5 कोटी शेतक-यांसाठी शासन भूमिका का घेत नाही, याचे कारण मीडियाला चिंता शहरातील लोकांचीच असून, कर्मचा-यांची एकजूट आणि सरकारला असलेली मताची चिंता हे मुळ कारण आहे. आपण शेतकऱ्यांची मुले असूनही आपल्याला शेतक-यांबद्दल कळवळा राहीलेला नाही. त्यासाठी डोक्यातून राजकीय पक्ष, धर्माचा झेंडा काढून टाकण्याची गरज आहे. जात-पात-धर्माचा विचार न करता शेतक-यांचा विचार करायचा ठरवल्यास शेतक-यांचे दु:ख, वेदना कमी होऊ शकतात.
कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ.अभय शहापूरकर,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर,राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे सचिव धनंजय पाटील, उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख,पालिकेतील शिवसेनेचे गटनेते सोमनाथ गुरव, खलिफाा कुरेशी, डॉ.राहूल गवळी, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष अभिजीत निंबाळकर,ओंकार नायगावकर, माजी अध्यक्ष विष्णु इंगळे आदी उपस्थित होते.तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. नगराध्यक्ष मकरंदराजे यांनी अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन विशाल गवळी यांनी केले. कार्यक्रमासाठी शिवप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
 
Top