उस्मानाबाद/प्रतिनिधी-
अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे सोयाबीनच्या झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपनीच्या माध्यमातून किमान 20 हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी रविवारी (दि.23) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. राष्ट्रीयीकृत बँकेचा खाते नंबर दिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून, जिल्हा बँकेतही 3.20 कोटी जमा झाल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली
पत्रकात म्हटले आहे की, बहुतांश पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे काढणी दरम्यान व काढणी पश्चात प्रचंड नुकसान झाले होते. पीक कापणी प्रयोगातून निष्पन्न झालेले उत्पन्न उंबरठा उत्पादनापेक्षा जास्त दिसून येत असल्याने काढणी पश्चात नुकसान असून देखील नुकसान भरपाई देण्यास विमा कंपन्या असमर्थता दर्शवत होत्या. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी शेतक-यांनी विमा कंपनी व कृषी विभागाकडे अर्ज केले होते. तसेच नुकसानीची तीव्रता लक्षात घेवून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. विमा कंपनीने यंत्रणा नसल्यामुळे कृषी व महसूल विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरण्याचे मान्य केले होते. परंतू कृषी व महसूल विभागाकडून विहित नमुन्यात झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे सोयाबीन पिकाचा विमा मिळेल कि नाही, याबाबत सांशकता व्यक्त होत होती.यासंदर्भात नुकसानीपोटी विमा कंपनीच्या माध्यमातून किमान 20 हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

 
Top