उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता मुलींना नाही तर मुलांना खरी गरज आहे शिकविण्याची की कसे वागायचे, असे प्रतिपादन पत्रकार, कवी, वक्ते श्री. रवी केसकर यांनी आज येथे केले. प्रसारमाध्यम प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील महिला, महिला सामाजिक संस्था, बचतगटातील महिला यांच्यासाठी आज "महिला सुरक्षा" (सायबर सुरक्षा, महिलांची सामाजिक सुरक्षा, स्वसंरक्षण, महिलांविषयीचे वृत्तांकन) या विषयावरील कार्यशाळा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील डीपीडीसी हॉल येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी  प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री.शेळके, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. जाधव, लेखाधिकारी सीमा पाटील, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा,एस. ए.सय्यद,चंद्रसेन देशमुख,प्रवीण पवार,मल्लिकार्जुन सोनवणे,शीला उंबरे,श्री.सस्ते,बालकल्याण समिती सदस्य कस्तुराबाई कारभारी, विशाखा समिती अध्यक्ष श्रीम.बाबई चव्हाण,?ङ विद्युल्लता दलभंजन, ज्योती सपाटे, अर्चना अंबुरे, डॉ. दीपिका सस्ते, डॉ. ललिता स्वामी, डॉ. श्रद्धा मुळे, डॉ. अश्विनी सरडे, डॉ. दीप्ती शिंदे, डॉ. शिल्पा हंबीरे, ?ङ ज्योती बडेकर, नंदाताई पूनगडे आदी मान्यवर उपस्थित होते.  या कार्यशाळेस संगणक तज्ञ संदीप परांडे, उस्मानाबाद जिल्हा सायबर सेलच्या पोलीस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, श्रीमती पानसे, पत्रकार श्री.रवि केसकर,डॉ.अनुराधा गरड,डॉ.वसुधा दापके-देशमुख या तज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
 श्री. केसकर पुढे म्हणाले,मातृशक्ती सर्वश्रेष्ठ असून आजच्या सामाजिक परिस्थितीत मातृशक्ती समाजाला योग्य दिशा देण्याचे काम पार पाडू शकते, असा विश्वास मला वाटतो.  शासकीय व्यवस्थेतून पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
उस्मानाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक क्रांती सुधाकर ढाकणे आणि त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, श्रीमती पानसे यांनी सायबर लॉ तसेच पोलिसांची महिला सुरक्षा यंत्रणा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
संगणक तज्ञ श्री. संदीप परांडे यांनी इंटरनेटचा, सोशल मीडिया आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर कसा करावयाचा,ऑनलाईन खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. तर डॉ. वसुधा दापके-देशमुख व डॉ. अनुराधा गरड यांनी उपस्थितांना स्त्री आरोग्य, पोषण आहार, स्त्रियांचे आजार त्याचबरोबर स्त्रियांच्या सुरक्षित आरोग्य तपासण्या याविषयी मार्गदर्शन केले.
प्रत्येक व्याख्यानाच्या शेवटी उपस्थित व वक्ते यांच्यात प्रश्नोत्तररुपी सुसंवादही घडला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे उस्मानाबाद  तायक्वांडो असोसिएशनच्या राजेश महाजन, राम दराडे व त्यांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणाची उत्कृष्ट अशी प्रात्यक्षिके सादर केली. उपस्थित सर्वांनीच या प्रात्यक्षिकांना भरभरून दादही दिली.
या कार्यशाळेचे उद्घाटन अत्यंत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. सर्वप्रथम सर्व पीडित महिला-मुलींना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली आणि नंतर आतापर्यंतच्या सर्व कर्तृत्ववान महिलांचे स्मरण करून त्यांना उपस्थित सर्वांनी सॅल्यूट करून मानवंदना दिली, सर्वांची ही सामूहिक कृती म्हणजेच या कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन म्हणून जाहीर करण्यात आले. याशिवाय इयत्ता नववीत शिकणारी आणि राष्ट्रीय खो-खो खेळाडू  कु.नम्रता गाडे तसेच बीएससीच्या तिस-या वर्षात शिकणारी आणि यूपीएससीचा ध्यास घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी युवती कु. मधुरा बनसोडे यांना या कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मान देण्यात आला होता. या दोघींनी शेवटी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या दोघींच्या सत्काराबरोबरच त्यांच्या पालकांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यशाळेस विविध सामाजिक महिला संस्थांच्या पदाधिकारी, महाविद्यालयीन मुले-मुली, बचतगटाच्या महिला, महिला वकील संघाच्या पदाधिकारी, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला शासकीय अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेबाबतचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले तर सूत्रसंचालन आकाशवाणी निवेदिका अश्विनी मालखरे यांनी केले. शेवटी कार्यशाळेची सांगता महिला सक्षमीकरणावरील सुंदर अशा प्रोत्साहनपर गीताने करण्यात आली.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा महिला बाल विकास विभाग, जिल्हा क्रक्रीडा कार्यालय, उमेद, जिल्हा परिषद, सायबर सेल, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय डब्ल्यूडीडब्ल्यू आयएमए उस्मानाबाद  तायक्वांडो असोसिएशन,नेहरु युवा केंद्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाज कल्याण कार्यालय यांचे विशेष सहकार्य लाभले.
 
Top