उस्मानाबाद / प्रतिनिधी-उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष नेताजी पाटील यांनी पक्ष विरोधी कारवाई केल्याने राष्ट्रवादी पक्षातून त्याची हकालपट्टी केली आहे . जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदांच्या निवडीचा कार्यक्रम जवळ आलेला असतानाच राष्ट्रवादीने हकालपट्टीचा कार्यक्रम केल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश  बिराजदार यांनी कारवाईची माहिती दिली. नेताजी पाटील हे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात असल्याने या कारवाईमुळे राणा यांना धक्का मानला जात आहे .
पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आमदार राणा पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह अनेक सदस्यांनी भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित राहत विधानसभेत प्रचार केला होता. याच कारणामुळे नेताजी पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे बिराजदार यांनी सांगितले. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने ही कारवाई केली असली तरी भाजप आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना यांच्यासह इतर सदस्यांना मात्र अभय दिल्याचे समोर आहे आहे. घराणेशाहीतील नेत्यांना सोडत नेताजी पाटील सारख्या कार्यकर्त्यावर कारवाई करून बळीचा बकरा बनविल्याचे चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.


 
Top