उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय उस्मानाबाद येथील स्त्रीरोग व प्रसूती तंत्र विभागाच्या पदव्युत्तर पदवी विभागाच्या डॉ.चंदा तीर्थराम प्रजापती यांनी सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी घेतलेल्या 2018 मधील परीक्षेमध्ये अंतिम वर्ष पदव्युत्तर पदवी परीक्षेत स्त्रीरोग व प्रसूती तंत्र या विषयात 500 पैकी 342 गुण मिळवून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान डॉ. चंदा तीर्थराम प्रजापती यांनी पटकाविला आहे. विद्यापीठाच्या 20 व्या दीक्षांत समारंभात त्यांना डॉ. ताराबाई विष्णू लिमये सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
 उस्मानाबाद आयुर्वेद महाविद्यालयामध्ये अशी सुवर्णमय कामगिरी करणाऱ्या डॉ. चंदा या पहिल्याच विद्यार्थिनी ठरल्या आहेत. या यशामध्ये महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रकाश खापर्डे यांचे डॉ.चंदा यांना विशेष मार्गदर्शन लाभले असून डॉ. चंदा यांचे नाव महाविद्यालयाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल, अशी समाधानी भावना डॉ. खापर्डे यांनी व्यक्त केली आहे. स्त्रीरोग व प्रसूती तंत्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ.वीणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.चंदा प्रजापती यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे शोधप्रबंध सादर केला.
 विभागातील डॉ. भाग्यश्री खोत,डॉ. कुलकर्णी व डॉ. आगावणे यांचेही डॉ.चंदा प्रजापती यांना विशेष सहकार्य लाभले. या यशाबद्दल डॉ.चंदा प्रजापती यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
 
Top