हे माझे संमेलन म्हणून प्रत्येकांने कार्य करावे- तावडे 
 उस्मानाबाद /प्रतिनिधी-
मोठ्या प्रयत्नानंतर उस्मानाबादकरांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळालेले आहे. यात सर्वांचा सक्रिय सहभाग आवश्यक असून हे माझे संमेलन म्हणून प्रत्येक समिती सदस्याने जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी केले.
उस्मानाबाद येथे दि.10, 11, 12 जानेवारी 2020 रोजी होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीस वेग आला आहे. संमेलन नियोजनासाठी रविवारी(दि.22) संमेलन संपर्क कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध समित्यांचे गठण करून जबाबदारी निश्चित करण्यात आली. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे, प्रमुख कार्यवाह रवींद्र केसकर यांनी मार्गदर्शन केले.
संमेलनासाठी बाहेरुन येणारे निमंत्रित साहित्यिक, कवी, साहित्यप्रेमी नागरिकांचे आदरातीथ्य, त्यांची निवास, भोजन व्यवस्था चांगल्या प्रकारे करता यावी तसेच संमेलनस्थळी आसन व्यवस्था, मंडप व्यवस्था, स्वच्छता, वीज पुरवठा, चौकशी व तक्रार, विधी व शिस्तपालन अशा विविध समित्यांचे गठण होऊन सदस्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. बैठकीस नगरसेवक माणिक बनसोडे, अभय इंगळे, योगेश जाधव, सोमनाथ गुरव, युवराज नळे, सिद्धार्थ बनसोडे, पृथ्वीराज चिलवंत, सामाजिक कार्यकर्ते नाना घाटगे, श्रीराम मुंबरे, जिपच्या उपशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, विस्तार अधिकारी बालाजी यरमुनवाड, नगर परिषदेचे अभियंता दत्तात्रय कवडे, संमेलन संयोजन समितीचे कोषाध्यक्ष माधव इंगळे, सहकार्यवाह सतीश दंडनाईक, प्रशांत पाटील, प्राचार्य डॉ. जयसिंग देशमुख, सदस्य राजेंद्र अत्रे, आशिष मोदाणी, अग्निवेश शिंदे, श्रीकांत साखरे, कमलताई नलावडे, मीना महामुनी यांच्यासह विविध समितीचे समन्वयक, सदस्य तसेच या संयोजनात कार्य करू इच्छिणारे साहित्यप्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते.

 
Top