उस्मानाबाद/प्रतिनिधी -
आरोग्य क्षेत्रात गरजू रुग्णांच्या मदतीला नेहमीच धावून जाणा-या तसेच रक्तदानासाठी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करणा-या अंजुमन हेल्थकेअर सोसायटीला राज्यस्तरीय उत्कृष्ट संस्था पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तुळजापूर तालुक्यातील खडकी येथील अजिंक्य बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने भव्य समारंभात अंजुमन सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला यांना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अंजुमन हेल्थकेअर सोसायटीच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष फेरोज पल्ला यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबातील बांधकाम, हॉटेलमध्ये मोलमजुरी करणारे गरीब नागरिक, शेतकरी कुटुंबातील गरजूंना वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत उपलब्ध करुन देण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या तीन वर्षापासून ते अखंडपणे ही सेवा करत आहेत. त्याचबरोबर रक्तदानाचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती करुन रक्तदान शिबिरांचे आयोजनही ते करत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे अनेकांना जीवनदान मिळाले आहे. या कार्याची दखल घेऊन खडकी येथील अजिंक्य बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट संस्था पुरस्कार देऊन अंजुमन सोसायटीचा सन्मान करण्यात आला. सोसायटीच्या वतीने अध्यक्ष फेरोज पल्ला, अजीम शेख, वसीम शेख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम जवान, सचिव राम जवान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 
Top