उस्मानाबाद,/प्रतिनिधी - 
उस्मानाबाद शहरातील पापनाश नगर पारधी पिढी व साठे नगर येथे प्रधानमंत्री मातृवंदना सप्ताहाचे उद्घाटन सोमवारी (दि.2) वैरागरोड येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1 चे वैद्यकीय अधिकारी डॉ. शकील अहमद खान यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांना आरोग्यविषक माहिती तसेच शासकीय आरोग्य योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शासनाच्या योजनेतून लाभार्थ्यांना पहिल्या अपत्यासाठी मातेला 5 हजार रूपयांचा लाभ मिळतो. पहिला हप्ता 1 हजार रुपये, दुसरा हप्ता 2 हजार रुपये आणि तिसरा हप्ता 2 हजार रुपये अशी रक्कम मिळते. तसेच लाभार्थीने गरोदरपणाची नोंद आरसीएच पोर्टलमध्ये एएनएम यांच्याकडे मासिक पाळी चुकल्यानंतर 100 दिवसाच्या आत करणे आवश्यक आहे. गरोदरपणाच्या 6 महिन्यात म्हणजेच 180 दिवसांत किमान एक प्रसुतीपूर्व तपासणी होणे आवश्यक आहे. प्रसूतीनंतर बाळाच्या जन्माची नोंद, बीसीजी, ओपीव्ही (झिरो डोस) याची एक मात्रा, पेन्टा व्हेलेन्ट ओपीव्ही लसीच्या 3 मात्रा देणे आवश्यक आहे, अशी माहिती यावेळी डॉ. शकील अहमद खान यांनी दिली.
या कार्यक्रमास तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी बाळासाहेब काकडे, अनिल मगर, गायकवाड, परिचारिका थोरात, सुरवसे, मुंडे, तबस्सुम शेख, समिना शेख, रुकसाना शेख, नाझिया शेख, बनसोडे, बाबर, देवकुळे, सरवदे, खानापुरे यांच्यासह स्थानिक रहिवाशी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
 
Top