सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पोलिसात सतीश दंडनाईक यांची तक्रार
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अकरा जणांवर 307 प्रमाणे खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पोलिसात नोंद करण्यात आला आहे. खासदार ओमराजे , त्यांचे नातेवाईक हिम्मत पाटील, रवी पाटील यांच्यासह अन्य 8 अनोळखी आरोपींचा समावेश आहे .
रविवार रात्री तुळजापूरचे भाजप आमदार राणा पाटील यांच्यासह इतरांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाल्यावर सोमवार दि.३० डिसेंबर रोजी रात्री उशीरा खासदार ओमराजेवर गुन्हा नोंद झाला आहे यानिमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यात पाटील व राजेनिंबाळकर सत्ता संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे .
कळंब पंचायत समिती सभापती निवडीवरून मारहाण केल्याची तक्रार उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक यांनी दिल्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दंडनाईक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 29 डिसेंबर रोजी ते स्वत: गणेश भातलवंडे व गाडी चालक पोपट चव्हाण हे मिळून रात्री 8.30 वाजता अकलूज येथे गेलो. कळंब पंचायत समिती सदस्य हिम्मतराव पाटील यांच्या घरी असल्याची खात्री करण्यासाठी गेलो असता 3 पंचायत समिती सदस्य देण्याची विनंती केली, हे सदस्य स्वखुशीने आलेत की बळजबरीने याची खात्री करायची असे सांगितल्यावर हिम्मतराव पाटील यांनी दंडनाईक यांच्यावर हल्ला केला त्यानंतर जीव वाचविण्यासाठी मी पळालो असता माझा 1 किमी पाठलाग करून मला पकडले व घरात आणून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. हिम्मतराव पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना फोन लावला व सांगितले की मी यांना पकडले आहे त्यावर ओमराजे फोनवर म्हणाले की त्यांना सोडू नका त्यांना धडा शिकवा असे मी फोन स्पीकरवर ऐकले आहे.  भातलवंडे आणि चव्हाण यांनाही पकडून मारहाण केली. हिम्मतराव पाटील यांनी त्यानंतर आम्हाला अकलूज पोलिसांच्या ताब्यात दिले माझ्या पायाला व हाताला मुक्कामार लागला आहे. मी घाबरल्याने फिर्याद दिली नव्हती मात्र माजी मानसिक स्तिथी ठीक झाल्याने व भीती कमी झाल्याने अटकेत असताना तक्रार देत आहे.

 
Top