उस्मानाबाद/प्रतिनिधी-
घरासमोर खेळणा-या मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून अत्याचार करणा-या नराधमास उस्मानाबाद येथील विशेष सत्र न्यायाधीश आर. जे. राय यांनी दहा वर्ष सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
उस्मानाबाद शहरात 17 जानेवारी 2018 रोजी दुपारी एक ते दीडच्या दरम्यान एका भागात वास्तव्य करणा-या कुटुंबातील एक मुलगी घरासमोर खेळत होती. याच दरम्यान त्या बालिकेला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून अभिजित अनुराग पेटकर याने तिला घरात ओढून नेले. घरातील कडी लावून तिच्या तोंडात बोळा कोंबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिला दोन रुपये देऊन घरी पाठवले. बालिका जखमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिच्या पालकांच्या फिर्यादीवरून उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार पेटकरच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक पी. व्ही. माने यांनी तपास करून तातडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश आर. जे. राय यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू झाली. यामध्ये सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले.
यामध्ये पीडिता, तिची आई व घराशेजारी महिलेची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. विशेष म्हणजे आरोपीच्या बाजूनेही एक साक्षीदार तपासण्यात आला. मात्र, समोर आलेले पुरावे पोलिसांनी केलेला योग्य तपास, वैद्यकीय अहवाल तसेच अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश राय यांनी अभिजित पेठकर याला दोषी धरले. त्याला दहा वर्ष सक्तमजुरी वीस हजार रुपये दंड ठोठावला. तसेच दंड न भरल्यास आणखी सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा भोगण्याचे आदेश दिले. न्यायालयात जमा केलेल्या दंडा पैकी दहा हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेश देण्यात आले.
 
Top