उस्मानाबाद/प्रतिनिधी -नूतन पोलिस अधीक्षक राज तिलक राेशन यांनी पोलिस दलाच्या कारभाराला गतीमान करण्यासाठी रुजू झाल्यानंतर आठवडाभरातच ९ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये महत्वाच्या दरोडा प्रतिबंधक पथकाचे सपोनि गणेश मुंडेंची शहर ठाण्यात बदली करण्यात आली असून हे पथक एलसीबीला सलग्न करण्यात आले आहे. तर विविध प्रकरणाने चर्चेत आलेल्या आनंदनगरच्या हरिभाऊ खाडेंची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. 
राज तिलक रोशन यांनी २६ ऑगस्ट रोजी पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्विकारल्यानंतर पोलिस दलाच्या कारभाराला गती देऊन मागील काळात निर्माण झालेल्या प्रतिमेला बदलण्यासाठी पाऊले उचलण्यास प्रारंभ केला आहे. याचाच एक भाग म्हणून दि.२ सप्टेबर रोजी जिल्ह्यातील २ निरीक्षक, ०६ सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह एका पोलिस उपनिरीक्षकाची खांदेपालट केल्याचे आदेश काढले आहेत. बदल्या झालेल्यांमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षकांत ज्ञानेश्वर राऊत यांची नियंत्रण कक्षातून डीएसबीच्या सुरक्षा शाखेत, शिवाजी गुरूमेंची नियंत्रण कक्षातून शिराढोण ठाणे, भगवान नाईकवाडींची एटीसीतून ग्रामीण पोलिस ठाणे, गणेश मुंडेंची दरोडा पथकातून शहर ठाणे, हरिभाऊ खाडेंची आनंदनगर येथून नियंत्रण कक्षात तर शिराढोणच्या माजीद शेख यांची आनंदनगरला बदली झाली आहे. पोलिस निरीक्षकांमध्ये नियंत्रण कक्षातील शंकर शेजाळ व सतिश चव्हाण यांची अनुक्रमे आर्थिक गुन्हे शाखा व आनंदनगर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. तर नियंत्रण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक डी. पी. सानप यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.

 
Top