उमरगा/प्रतिनिधी-
काँग्रेस आणि भाजपची सत्ता असलेल्या उमरगा नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अर्धा कोटीच्या भ्रष्टाचाराची चर्चा सध्या शहरात चांगलीच सुरू आहे. याप्रकरणातील लेखापालासह दोन कंत्राटी कर्मचारी व दोन खासगी व्यक्ती असे सर्वच 5 आरोपी गुन्हा दाखल होण्याची चाहुल लागताच फरार झाले आहेत.
पालिकेतील 49 लाख 56 हजार 453 रुपयांच्या अपहार प्रकरणातील पाचही आरोपी चार दिवस झाले तरी फरारच आहेत. इतकेच नव्हे तर ह्या गुन्हातील एका संशयीत आरोपीने इनोव्हा कार काही दिवसापुर्वीच खरेदी केली असल्याची माहिती सुत्राकडुन मिळाली आहे. उमरगा नगर पालिकेकडे प्राप्त झालेल्या दलितोत्तर योजनेचा निधी तालुक्यातील गुंजोटी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत मुख्याधिकारी, नगर परिषद यांच्या नावाने काढलेल्या बँक खात्यात जमा होतो. सदरील बँक खाते उमरगा शाखेऐवजी ग्रामीण भागात गुंजोटी येथेच का काढण्यात आले हा चर्चेचा विषय झाला आहे.

 
Top