उस्मानाबाद/प्रतिनिधी-उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील सन 2017 मध्ये पीककापणी प्रयोगातील चुका व त्रुटींमुळे वंचित हजारो शेतक-यांना पीकविमा मिळावा यासाठी राणाजगजितसिंह पाटील यांनी हायकोर्टात दाद मागितली होती. त्यानुसार हायकोर्टाच्या आदेशावरून सदरील शेतक-यांना पीकविमा देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मंजूर झालेल्या रकमेचे जिल्हा बँकेतून वाटप सुरू करण्यात आले आहे. या पीकविमा वाटपाचा प्रातिनिधीक स्वरूपातील शुभारंभ कसबे तडवळे येथे माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील, जिप अध्यक्ष नेताजी पाटील व भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
सन 2017 मध्ये पीक कापणी प्रयोगातील त्रुटीमुळे खरीप 2017 मधील 81,773 शेतकरी सोयाबीन पीक विम्यापासून वंचित होते. सदरील चुका जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त यांच्यासह कृषी, महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून देत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करून पीक नुकसानी पोटी विमा भरपाई देण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पीक कापणी प्रयोगामध्ये झालेल्या चुका मान्य केल्या परंतु, तांत्रिक अडचणीमुळे विमा मिळत नव्हता. यामुळे राणाजगजितसिंह पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती. याची दखल घेत न्यायालयाने दोन महिन्याच्या आत पीक विमा वितरित करण्याचे आदेशित केले. त्यानुसार शासनाने उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील सोयाबीन पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या 81,773 शेतक-यांना 29. 94 कोटी पीक विम्यापोटी वितरित करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे वर्ग केले होते. सदरील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी पंस सभापती बालाजी गावडे, उपसभापती श्याम जाधव, सरचिटणीस सतिश देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक, भारत डोलारे, त्र्यंबक कचरे, नाना वाघ, सुधीर करंजकर, बालाजी कोरे, शशांक सस्ते, भारत लोंढे, बँकेचे शाखाधिकारी आर. एस. घुटे व सर्व कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. 
 
Top