नळदुर्ग/प्रतिनिधी-
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये वीस हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे, शहरातील सर्व गणेश मंडळे, सामाजिक संस्था व नागरीकांनी यामध्ये सहभागी होवून जास्तीत जास्त झाडे लावण्याचे आवाहन मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड व पालिकेच्या स्वच्छता, आरोग्य व दिवाबत्ती सभापती सौ. भारती बनसोडे यांनी केले आहे.
शहरात मोठया प्रमाणात वृक्ष लागवडीचा संकल्प पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. स्वच्छ आणि सुंदर नळदुर्ग बनविण्यासाठी, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्राच्या खुल्या जागेवर आता पर्यंत दोन हजार झाडे पालिकेच्या वतीने लावण्यात आले आहेत. चिंच व लिंब यासह विविध फळझाडे व प्राण वायु देणारे रोपटे लावण्यात आले आहेत. विविध गणेश मंडळे, सामाजिक संस्था, कार्यकर्ते व नागरीकांच्या सहकार्याची व पुढाकाराची गरज असून वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वृक्ष लागवडीसाठी पालिकेच्या वतीने वृक्ष पुरविण्यात येणार आहेत, सामाजिक वनीकरण विभागाने नुकतेच पाच हजार रोपटे पुरवले आहेत या शिवाय आणखीन ही रोपटे त्यांच्याकडून मिळणार आहेत. गणेशोत्सवात सामाजिक बांधीलकी जोपासण्यासाठी संबंधीत गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांनी पालिकेशी संपर्क करुन नाव नोंदणी करण्याचे मुख्याधिकारी राठोड यांनी सांगून वृक्षारोपण सारख्या राष्ट्रीय कार्यास सर्वांनी हातभार लावावा असे ही त्यांनी म्हटले आहे. शहरातील अंतर्गत रस्ते, स्मशान भूमी, प्रभागातील पालिकेच्या खुल्या जागेवर, तर नागरीकांनी आप आपल्या घरासमोर उपलब्ध जागेवर वृक्ष लागवड करुन संवर्धन करावे. सुंदर नळदुर्ग करण्यासाठी व पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी सहभागी होण्याची विनंती सभापती सौ. भारती सुनिल बनसोडे यांनी केले आहे.

 
Top