धाराशिव (प्रतिनिधी) – कौशल्य विकास, युवक-युवती सक्षमीकरण, ग्रामीण विकास, जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत शेती या विविध क्षेत्रांत दीर्घकाळ सातत्यपूर्ण, परिणामकारक आणि लोकसहभागातून कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश कैलासचंद्र चादरे (टाटा सामाजिक विज्ञान संस्था – TISS, तुळजापूर कॅम्पस) यांची छत्रपती संभाजीनगर विभागस्तरीय रोजगार मेळावा समन्वय समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
ही नियुक्ती मा. ना. मंगल प्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महाराष्ट्र राज्य यांच्या शिफारशीने तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे. त्यांच्या व्यापक अनुभव, नेतृत्वगुण आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील भरीव कामगिरीचा सखोल विचार करून करण्यात आलेली ही निवड अत्यंत योग्य ठरल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. या नियुक्तीमुळे छत्रपती संभाजीनगर विभागातील रोजगार निर्मिती व कौशल्य विकास चळवळीला निश्चितच अधिक गती मिळणार आहे.
धाराशिव जिल्हा तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, कौशल्याधारित प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी श्री चादरे यांनी TISS च्या माध्यमातून अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक कार्य केले आहे. त्यांच्या पुढाकारातून अनेक रोजगार मेळावे, करिअर मार्गदर्शन शिबिरे आणि उद्योजकता विकास उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आले असून, हजारो युवकांना त्याचा थेट लाभ झाला आहे.
गणेश चादरे यांनी जिल्हा कौशल्य विकास विभाग, एनएसएस, एनसीसी शिबिरे, आयटीआय, विविध महाविद्यालये, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम), मिटकॉन, सीएमईजीपी, पीएमईजीपी, डीआयईटी आदी संस्थांच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमांमध्ये विषय तज्ञ व प्रेरणादायी वक्ते म्हणून ३०० हून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक युवक-युवतींनी केवळ नोकरीच्या संधींचाच लाभ घेतला नाही, तर उद्योजकतेच्या दिशेनेही आत्मविश्वासाने यशस्वी वाटचाल सुरू केली आहे.
याशिवाय, त्यांनी “छत्रपती शाहू महाराज करिअर मार्गदर्शन मेळावा” (शासकीय आयटीआय) तसेच TISS च्या विविध क्षेत्रकार्य व संशोधन प्रकल्पांद्वारे, तसेच केंद्र, राज्य आणि जिल्हा प्रशासनाच्या विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक समिती सदस्य म्हणून सक्रिय सहभाग नोंदविला आहे. ग्रामीण व शेतकरी सक्षमीकरण, जलसंवर्धन, सेंद्रिय शेती, ग्रामविकास आणि लोकसहभागी विकास या क्षेत्रांतील त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय असून, त्यांनी केलेले सर्वेक्षण, संशोधन व धोरणात्मक मार्गदर्शन यामुळे त्यांच्या कार्याला व्यापक आणि शाश्वत दिशा मिळाली आहे.
चादरे यांना त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सन २०११ मध्ये भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयामार्फत चीन अभ्यास दौऱ्यासाठी त्यांची निवड होणे, तसेच त्या दौऱ्यात भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेली गांधी टोपी परिधान करून तत्कालीन चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा सन्मान करण्याचा मान मिळणे, ही त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरील उल्लेखनीय दखल आहे.
या निवडीबद्दल विविध शासकीय विभाग, सामाजिक संस्था, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, सहकारी आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ही निवड मराठवाड्यातील युवकांसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
प्रतिक्रिया देताना श्री गणेश चादरे म्हणाले,“ही जबाबदारी माझ्यासाठी केवळ सन्मान नसून समाजाप्रती असलेले कर्तव्य अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची मोठी संधी आहे. रोजगारसंधी निर्माण करणे, कौशल्य विकासाला चालना देणे आणि युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या दिशेने प्रवृत्त करणे यासाठी मी अधिक समर्पितपणे कार्य करणार आहे.”.
