उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रक्रियेत जिल्हा नियोजन समिती सदस्यांची भूमिका अत्यंत महत्तवाची असून त्यांनी आपले अधिकार ओळखून लोकविकासाभिमुख प्रस्ताव नव्याने सादर करा, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी आज येथे केले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बैठक सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, खा.ओम राजेनिंबाळकर, सर्वश्री आमदार मधुकरराव चव्हाण, ज्ञानराज चौगुले, राणाजगजितसिंह पाटील, राहुल मोटे तसेच  जिल्हा नियोजन समितीचे  सन्माननीय सर्व सदस्य, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे हे उपस्थित होते.
पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत यांनी या बैठकीत आतापर्यंत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या  कामकाजाचा  सविस्तर आढावा घेतला. यात प्रामुख्याने ग्रामीण रस्ते, शेतकऱ्यांसाठी डीपी, चारा, ऑईल, ट्रान्सफॉर्मर्स, पीक कर्ज, पीक विमा, शाळांच्या संरक्षक भिंती, ग्रामपंचायतींना नागरी सुविधा अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. याबरोबरच पालकमंत्री महोदयांनी बैठकीस उपस्थित सर्वांना जिल्ह्यातील चारा छावण्या 31 ऑगस्टपर्यंत कोणत्याही परिस्थितीत चालूच राहतील, असे सांगून ज्या चारा छावण्यांना पाण्याची गरज आहे, अशा चारा छावण्यांना जिल्हा प्रशासनाने पाणीपुरवठा करावा, असाही निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्याची वस्तुस्थिती मांडून चाऱ्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, असेही प्रा.डॉ. श्री. सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिला.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या सुरुवातीस सांगली- सातारा, कोल्हापूर या भागात पुरामुळे मृत पावलेल्यांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच प्रधानमंत्री किसान मानधन योजना या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रचार प्रसिद्धी करिता पोस्टरचे प्रकाशन पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील,
खा.ओम राजेनिंबाळकर, सर्वश्री आमदार मधुकरराव चव्हाण, ज्ञानराज चौगुले, राणाजगजितसिंह पाटील, राहुल मोटे तसेच  जिल्हा नियोजन समितीचे  सन्माननीय सर्व सदस्य, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे,सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी  सोमनाथ रेड्डी या सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. या बैठकीस विविध शासकीय विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
 
Top