काटी /प्रतिनिधी - तुळजापूर तालुक्यातील सावररगाव येथील प्रसिद्ध श्री नागोबा यात्रेस मंदीरातील नागोबाच्या मुर्तीस बुधवारी  जलाभिषेक, तैलाभिषेक, पंचामृत, स्नान व रुद्राभिषेक  घालून  उत्साहात प्रारंभ झाला. या यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेले नाग, पाल, विंचू आषाढ  अमावस्यादिवशी बुधवारी  दुपारी 1:15 वाजता  एकत्रित आले आणि दर्शन घेण्यासाठी बुधवारपासून भाविकांची गर्दी होत आहे.
एकमेकांचे कट्टर  हाडवैरी  समजले जाणारे नाग,पाल, विंचू हे उभयचर प्राणी आषाढ  अमावस्या  ते श्रावण  नागपंचमी  या कालावधीत  होणाऱ्या   नागोबा यात्रेत एकत्रित येत असल्याचे दृश्य प्रतीवर्षी पहावयास मिळते़. यंदा
त्यांचा मुक्काम पाच दिवस मंदिरासमोरील दगडी  शिळेखाली असणार आहे.
यात्रेच्या तिसऱ्या दिवशी  शुक्रवारी दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती़ शनिवारी  पहाटे साडेचार वाजता खर्ग डोहाजवळ पुजारी कल्याण स्वामी यांचे डोक्याचे केस कापून खर्गा विधी धार्मिक  वातावरणात  पार पडला. रविवारी नागोबा उपवास असल्याने   महिला वारूळ पुजनासाठी मंदिरात येतात़ नागोबाला लाह्या, दूध अर्पित केले जाते़. तर  सोमवार दि.5 रोजी नागपंचमी असल्याने राज्याच्या  कानाकोपर्‍यातून भाविकांची  दर्शनासाठी प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी मोठी  गर्दी होणार आहे. त्या अनुषंगाने  येथील ग्रामपंचायतच्या वतीने  सरपंच  रामेश्वर  (आबा) तोडकरी, उपसरपंच  आनंद  बोबडे हे भाविकांना सुविधा  देण्यासाठी  परिश्रम  घेत आहेत.
एकमेकांचे शत्रू  समजले जाणारे नाग, पाल, विंचू  हे नागोबा  यात्रेत दरवर्षी  एकत्रित  येत असल्याने आजच्या  काळात या यात्रेकडे  सर्वधर्मसमभावाचे प्रतिक म्हणून  भाविकांमधून पाहिले  जाते.
*पोलीस  प्रशासनानेही घेतला आढावा* 
 तामलवाडी पोलीस ठाण्याच्या   सहाय्यक  पोलीस निरीक्षक मंजुषा सानप यांनी गुरूवारी सायंकाळी येथील  ग्रामपंचायत  कार्यालयात ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते  यांची पाच दिवस  चालणाऱ्या यात्रेतील बंदोबस्तासंबंधी बैठक  घेऊन  बैठकीत  पार्किंग  व्यवस्था, मिरवणूक  मार्ग  आदी विषयांवर  चर्चा करण्यात आली. यात्रेनिमित्त  मंदीर  परिसरात  प्रासादिक साहित्य, खेळणी,  पाळणे,  आदी दुकाने थाटली आहेत. नागोबा यात्रेत लिंबाऱ्याच्या माळेला महत्त्व आहे़ या माळा मिरवणुकीत प्रत्येक भाविकांच्या गळ्यात घातल्या जातात़ ती माळ बनविण्याचा मान मागील तीन पिढ्यांपासून म्हणजे  जवळपास  60 वर्षापासून सावरगाव येथील हरिदास डोके यांच्याकडे आहे़. नागोबा  यात्रेसाठी महत्वाच्या  समजल्या  जाणाऱ्या  लिंबार्‍या गोलाकार  माळा बनविण्याचे काम डोके कुटूंबिय अमावस्येपासून करीत आहेत. ही सेवा  डोके हरिदास  डोके कुटूंबिय  मागील  60 वर्षापासून  करीत आहेत. यंदा साडेपाच  हजार  माळा बनविण्याचा संकल्प  असल्याचे  हरिदास  डोके यांनी सांगितले.
 
Top