उस्मानाबाद / प्रतिनिधी- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 या निवडणुकी दरम्यान मतदान केंद्राध्यक्ष म्हणून कार्यरत असताना सचिन पांडुरंग देशमुख यांचे मतदानाच्या दिवशी हृदयविकारामुळे अकस्मात निधन झाले होते. संबंधित प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी तहसिलदार, तुळजापूर यांच्याकडून तात्काळ अहवाल मागवून मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र शासन यांना सादर केला आणि या प्रकरणी वेळोवेळी पाठपुरावा करून व्यथित कुटुंबाला शासनाकडून पंधरा लाख रुपयांची सानुग्रह मदत मिळवून दिली.
जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे यांनी मयत स्व.श्री सचिन देशमुख यांच्या पत्नी व दोन्ही लहान मुलांच्या भविष्याचा विचार करीत मिळालेल्या 15 लाख रुपयांपैकी 5 लाख रूपये मुलगी हर्षाली व 5 लाख रुपये मुलगा जन्मजेय यांच्या नावाने बँकेत तीन वर्षाकरिता कायम ठेव ठेवून त्यांचे शिक्षण व लग्न यासाठी तरतूद केली, तर उरलेले रूपये 5 लक्ष पत्नी मनिषा यांच्या नावे दिले.
याप्रसंगी मयत स्व.श्री देशमुख यांच्या पत्नी श्रीमती मनिषा अतिशय भावनिक झाल्या होत्या.त्यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. प्रताप काळे, तुळजापूर तहसिलदार श्रीमती योगिता कोल्हे,नायब तहसिलदार श्री.अमित भारती, निवडणूक नायब तहसिलदार श्री.चेतन पाटील,श्री.राजीव बाबळे,श्रीकांत अंधारे यांनी दाखविलेली संवेदनशीलता व मदत मिळवून देण्यासाठी केलेला पाठपुरावा याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
जिल्ह्यातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. कर्त्या कुटुंबप्रमुखाच्या जाण्याची उणीव कशानेच भरून निघत नाही परंतु अशा दुर्दैवी परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाच्या कुटुंब प्रमुख म्हणून जिल्हा धिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि कर्तव्यतत्परता यामुळे स्व.सचिन देशमुख यांचे कुटुंब भविष्यात खंबीरपणे उभे राहील, असा सर्वांना विश्वास आहे. याबद्दल समाजातील सर्व स्तरातून जिल्हा प्रशासनाचे कौतुक होत आहे.

 
Top