उमरगा/प्रतिनिधी-
येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन व कोनशिला समारंभ रविवारी (दि.4) सकाळी 11 वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी दिली.
उमरगा शहरात न्यायालयाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन व कोनशिला समारंभाची माहिती देण्यासाठी न्यायालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ओमप्रकाश जयस्वाल राहणार आहेत. जिल्हा न्यायालयाचे कामकाज करण्यासाठी सध्याची इमारत अपूरी पडत असून तालुका न्यायालयाचे कामकाजही निजामकालीन इमारतीत सुरू आहे. ही इमारत नाजूक झाली असतानाही तेथे कामकाज सुरू आहे. त्यामुळे जिल्हा न्यायालयाची स्वंतत्र नवीन इमारत होणे आवश्यक होते. त्यासाठी न्याय विभागाने जवळपास अठरा कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यातील दोन कोटी निधी संबंधित विभागाकडे वर्ग झालेला आहे. इमारतीची रचना वन प्लस थ्री असून तळमजल्याच्या अर्ध्या भागात न्यायाधिशाच्या वाहनांचे पार्किंग, उर्वरीत भागात कॅन्टीन, एटीएम, रेल्वे आरक्षण तसेच वरच्या इमारतीत सहा न्यायालय कक्ष, विधीज्ञ कक्ष, बैठक कक्ष, पक्षकारासाठी बसण्यासाठी विभाग, अभ्यासिका कक्ष, अपंग व्यक्तीसाठी लिफ्टची सोय यासह विविध सोयी सुविधा इमारतीत राहणार आहेत. पुढील पन्नास वर्षाच्या नियोजनानुसार इमारतीच्या बांधकामाची रचना असून ही सुंदर व देखणी वास्तू असेल असेही न्यायाधीश साळुंके यांनी सांगितले. यावेळी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) एन. के. कारंडे, प्रथम वर्ग न्यायाधिश एम. टी. बिलाल, न्यायाधिश एस. एम. चव्हाण, न्यायाधिश ए. डी. पाटील, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. दिलीप सगर, सचिव अॅड. एस. पी. इनामदार, अॅड. पी. एन. पणूरे, अॅड.  व्ही. एस. आळंगे, अॅड.  प्रविणचंद्र तोतला यांच्यासह इतर विधिज्ञ उपस्थित होते
 
Top