|
नैसर्गिक अवकृपेने सातत्याने दुष्काळाच्या छायेत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद वस्त्रोद्योगात असल्याने कौडगाव येथील औद्याेगिक वसाहतीमध्ये तांत्रिक वस्त्र निर्मितीचे केंद्र (टेक्निकल टेक्स्टाईल हब) उभा करावे, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे. तांत्रिक वस्त्रोद्योग म्हणजे, तंत्रज्ञान आणि इतर कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या कापडांची निर्मिती करणारा विभाग होय. ह्या विभागात केवळ कापडच नव्हे तर कृषी, वैद्यकीय क्षेत्र, पायाभूत सुविधा, ऑटोमोटीव्ह, एअरोस्पेस, क्रीडा, संरक्षण आणि पॅकेजिंग अशा विविध क्षेत्रासाठी लागणाऱ्या वस्त्र आणि इतर वस्तूंच्या उत्पादनांचा समावेश होतो. उस्मानाबाद जिल्ह्याचे अर्थकारण प्राधान्याने शेतीवर अवलंबून आहे. सातत्याने होत असलेल्या निसर्गाच्या अवकृपेमुळे पर्जन्यमान अत्यल्प आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. कौडगाव औद्याेगिक वसाहतीत मुबलक जमीन, उजनी योजनेतून १ एमएलडी पाणी, उच्च दाबाची वीजवाहिनी व रिलायन्सची गॅसलाईन याच क्षेत्रातून पुढे जात आहे. तसेच उस्मानाबाद रेल्वे स्थानक १२ ते हवाई धावपट्टी १४ अशा आवश्यक पूरक बाबी येथे उपलब्ध असून यांचा विचार करून टेक्निकल टेक्स्टाईल हब सुरू करण्याबाबत कालमर्यादेसह कृती आराखड्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार पाटील यांनी जिल्हावासीयांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना भेटून केली आहे. | ||
