| प्रतिनिधी/उस्मानाबाद - तेलंगणा सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांना पेरणीसाठी एकरी १० हजार रुपये द्यावे, सन्मान निधीत अंतर्गत कपात केलेली २५ टक्के रक्कम परत करावी, खते, बियाणे व कीटकनाशकाचे कमी करावेत, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी (दि.१८) संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. महाराष्ट्र राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून बँकाकडून पीक कर्ज देण्यासटाळाटाळ केली जात आहे. यामुळे खरीप हंगाम पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची महत्त्वाची प्रश्न प्रलंबीत असून याकडे शासन लक्ष देण्यास तयार नाही, यामुळे शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. शासनाने सरसकट कर्जमाफी न केल्यास संभाजी ब्रिगेड यापुढे राज्यभर उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष, व्यसनमुक्ती कक्ष महाराष्ट्रचे डॉ. संदीप तांबारे, जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अर्चनाताई अंबुरे, जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. तानाजी चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष आकाश मुंडे, तालुकाध्यक्ष प्रतापसिंह गरड, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शामकांत नाईकनवरे, तालुकाध्यक्ष ब्रिगेड उमरगाचे मोहन जाधव, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष रविंद्र अंबुरे, ब्रिगेडचे शहराध्यक्ष आदित्य देशमुख आदींची उपस्थिती होती. |