ढोकी (प्रतिनिधी)-  कौटुंबिक वादातून पतीने आधी स्वतःच्या पत्नीची गळा दाबून निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतः शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिव तालुक्यातील कोल्हेगाव येथे 9 सप्टेंबर 2025 रोजी घडली होती. या दुहेरी मृत्यूच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात मयत पतीवर तब्बल 8 महिन्यानंतर 4 मे 2026 रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्षी श्रीकृष्ण टेकाळे (वय 22) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर श्रीकृष्ण तुकाराम टेकाळे (वय 27, दोघेही रा. कोल्हेगाव, ता. जि. धाराशिव) असे पत्नीची हत्या करून आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण आणि साक्षी यांच्यात कौटुंबिक कारणांवरून वाद होते. या वादातूनच दरम्यान कोल्हेगाव येथे ही भयानक घटना घडली. रागाच्या भरात श्रीकृष्ण याने पत्नी साक्षी हिचा गळा दाबून तिला जीवे मारले. पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतः श्रीकृष्ण याने आपल्या शेतातील बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

एकाच कुटुंबातील दोघांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कोल्हेगावसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी सतीश शंकर शिंदे (वय 38, रा. वाखरवाडी, ता. जि. धाराशिव) यांनी ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या या प्रथम खबरेवरून मयत आरोपी श्रीकृष्ण टेकाळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 103 (1) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत.

 
Top