प्रतिनिधी/नळदुर्ग -
राज्यात गुटखा, पानमसाला विक्री, वाहतुकीवर बंदी असताना परराज्यातून हुमनाबादवरून महाराष्ट्रात विक्रीसाठी चोरट्या मार्गाने ट्रकमधून येत असलेला ३६ लाख १० हजार ८०० रुपयांचा गुटखा नळदुर्ग पोलिसांनी कारवाई करून जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि.१६) रात्री ११ वाजेच्या सुमारास नळदुर्ग शहराजवळ रुद्रा हॉटेलसमोर करण्यात आली. महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असताना त्याची अवैधरित्या चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात तस्करी व विक्री होत आहे. गुटख्याचा मोठा साठा घेऊन एक ट्रक हुमनाबाद येथून नळदुर्गच्या दिशेने येत असल्याची माहिती नळदुर्ग पोलिसांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानुसार मिळालेल्या माहितीतील संशयीत ट्रक क्र. एमएच ४३ यू १६२८ हा नळदुर्गचे पोलिस उपनिरीक्षक अनिल खोडेवाड व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी सापळा रचून रविवारी रात्री हॉटेल रुद्रा समोर ताब्यात घेतला. सदरील ट्रक ताब्यात घेऊन पोलिस ठाणे येथे आणत याबाबत तत्काळ अन्न व औषध प्रशासनास माहिती दिली. माहिती मिळताच उस्मानाबादचे अन्न सुरक्षा अधिकारी विनायक शेटे, नमुना सहाय्यक एस.ए.अकोसकर यांनी नळदुर्गकडे धाव घेत पंचासमक्ष 
ट्रकची तपासणी केली. यावेळी ट्रकमध्ये गोवा-१००० नावाचा ५८ पोते गुटखा (६ हजार पाकिटे ) ज्याची किंमत ३६ लाख १० हजार ८०० रुपये इतका मोठा साठा आढळून आला. त्यानुसार पंचनामा करत गुटख्यासह दहा लाखाचा ट्रक असा एकूण ४६ लाख १० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शेटे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक जगन्नाथ उर्फ संभाजी गायकवाड (रा. भुयार चिंचोली ता. उमरगा) याच्याविरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. तसेच ट्रकच्या तपासणीत ट्रकमालक म्हणून शेख जिलानी शेख रब्बानी (रा.शाह नगर, बसवकल्याण कर्नाटक) याच्या नावाचा वाहन परवाना व ट्रकचे कागदपत्रे मिळून आले आहेत. जप्त मालातील काही नमुने तपासणीसाठी प्रयाेगशाळेकडे पाठविण्यात आले असून उर्वरीत साठा नष्ट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 
 
Top