प्रतिनिधी / उस्मानाबाद -
शहरात विविध ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात यावे, अशी मागणी फोरम ऑफ उस्मानाबाद सिटीझन्स संघटनेच्या वतीन करण्यात आली आहे.
वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मुख्य रस्त्याच्या पूर्वेला सांजारोडपासून जनता इंजिनिअरिंग वर्कशॉपपर्यंत अॅटो रिक्षा, टमटम, जीप प्रवाशी भरण्यासाठी थांबलेले असतात. त्यामुळे चौकात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोरील महात्मा बसवेश्वर चौकातही आपली वाहने बिनधास्त उभी करून लोक परिसरातील हॉटेलमध्ये, टपरीत बसतात. बार्शी नाका जिजाऊ चौकात सायंकाळी पाच ते दहापर्यंत दुचाकी व चारचाकी उभ्या असतात. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. शहरातील अनेक भागात अशीच परिस्थिती असून वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने बेशिस्त अॉटोरिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे सचिव धर्मवीर कदम, उपाध्यक्ष मुकेश नायगावकर, सहसचिव लक्ष्मण धाकतोडे, प्रभाकर गपाट, महेंद्र वाघमारे, विजय बागल, रंगनाथ भोसले यांच्या सह्या आहेत. 
 
Top