उमरगा/प्रतिनिधी-
तालुक्यातील सहा अंध व एका कर्णबधिर अशा सात दिव्यांग विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत उज्ज्वल यश संपादन करीत शिक्षणातील डोळसपणा सिद्ध करून दाखविला आहे. दरम्यान गटशिक्षण कार्यालयाच्या वतीने या दिव्यांग गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून भविष्यातील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
शासनाच्या समग्र शिक्षा समावेशक शिक्षण विभाग अंतर्गत अंध, कर्णबधिर विद्यार्थ्यांना पहिली पासून दहावी पर्यंतच्या शिक्षणासाठी विशेष शैक्षणिक पद्धतीचा अवलंब केला जात असून अंध, कर्णबधीर विद्यार्थ्याना ब्रेन लिपी व ऑडिओ क्लिपच्या माध्यमातुन दहावीच्या नियमित अभ्यासक्रमाचे धडे दिले जातात. मार्च २०१९ मध्ये झालेल्या दहावीच्या परिक्षेत बेळंबच्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची आशाबाई भालकडे या विद्यार्थींने जिद्द व कसोटी च्या बळावर ८४.८० टक्के गुण घेतले असून तिला भाग्यश्री तुगावे हीने लेखनिक म्हणून सहकार्य केले. याच विद्यालयाचा प्रेमनाथ भालकडे याने ७९ टक्के गुण घेतले त्यास प्रविण कांबळे याने सहकार्य केले. गुंजोटीच्या श्रीकृष्ण विद्यालयातील सोहेल मशाक याने ८०.४० टक्के तर बिलाल मशाक याने ७८.४० टक्के गुण प्राप्त करीत यश संपादन केले.माडजच्या जिल्हा परिषद प्रशालेची एैश्वर्या चंद्रकांत सगर हिने ६३.२०,बेडग्याच्या भारत विद्यालयाच्या आस्मा शेख हिने ५४.०२ टक्के गुण घेतलेे आहेत. तालुक्यातील अंध विद्यार्थ्याना लेखनिक म्हणून महेमूद बोरगावे, ओमकार पोतदार, स्वाती सुर्यवंशी, संपता कांबळे यानी दहावीच्या परिक्षेत सहकार्य केले. मुरूमच्या जिल्हा परिषद प्रशालेत कर्णबधीर असलेली आस्मा नदाफ हिने ८२.२० टक्के गुण प्राप्त केले. विविध शाळेतील सात दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात डोळस असल्याचे सिध्द केले आहे. दरम्यान बुधवारी (दि.१२) गटशिक्षण कार्यालयात गटशिक्षण अधिकारी डी बी बनसोडे, समावेशक विशेष तज्ञ सहदेव बोडरे यांच्या हस्ते दिव्यांग गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विशेष शिक्षक आर. एच. मोरे, एस आर आखंड, एस एम आखंड, जी बी पटणे, डी एल सोमवंशी, के एस सय्यद यांनीही गुणवतांचे कौतूक केले.
 
Top