प्रतिनिधी /उस्मानाबाद
|
| औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दुष्काळी पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.११) उस्मानाबादेत दुष्काळ, पाणीटंचाई व रोहयोची कामे यासंदर्भात सुरू असलेले काम व नियोजनाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी प्रशासकीय पातळीवर नियोजनाचाच दुष्काळ असल्याचे खुद्द आयुक्तांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी अधिका-यांना फैलावर घेतले. संतापलेल्या केंद्रेकर यांनी केवळ कार्यालयात बसून कागदे काळे करू नका. बाहेर पडा, प्रत्यक्षात भेटी द्या, तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी तेथे कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी स्वत: ची अक्कल चालवा अन्यथा नोकरी सोडून घरी जा, असा सज्जड दमच उपस्थित अधिका-यांना दिला. दुपारी १.३० वाजता सेंट्रल बिल्डींग येथील डीपीसी हॉलमध्ये सुरू झालेली ही बैठक तब्बल तीन तास म्हणजेच ४.३० वाजेपर्यंत चालली. यावेळी केंद्रेकर यांनी प्रत्येक बाबीच्या खोलात जाऊन प्रश्न, अडचणी विचारत चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या नियाेजनावरून अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. तालुकािनहाय आढावा घेताना प्रथम त्यांनी दुष्काळी परीस्थिती व पाणीटंचाईची माहिती व त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना याची माहिती घेण्यास प्रारंभ केला. यामध्ये पहिलाच क्रमांक उस्मानाबाद तालुक्याचा आला. यावेळी एसडीएम, तहसीलदार, बीडीओ व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांच्याकडे गंभीर परिस्थिती असलेल्या गावांचा माहिती विचारली. यावेळी अधिकाऱ्यांनी तेरणा प्रकल्पातून होणा-या ढोकी-येडशी-तेर-कसबे तडवळे या चार गाव पाणीपुरवठा योजनेबाबत सांगितले. यावेळी केंद्रेकर यांनी या संदर्भात काय नियोजन केले असे विचारल्यानंतर आता सुरू असलेली धावपळ अधिकाऱ्यांनी सांगितली. यामुळे संतापलेल्या केंद्रेकरांनी सगळ्यांनाच धारेवर धरत तहान लागल्यावर विहिर खोदतात काय असे विचारत तालुक्यातील टँकर, अधिग्रहण याबाबत विचारणा केली. याबाबतही माहिती सांगता येत नसल्याने त्यांनी कीती जणांनी संबंधित गावात जाऊन पाहणी केली असे विचारले. याबाबतही नकरात्मक उत्तर आल्यानंतर मात्र केंद्रेकर संतापले. त्यांनी थेट या अधिकाऱ्यांची अक्कल काढत केवळ कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवता, प्रत्यक्षात फिल्डवर काय चालते माहिती नसते, जनतेशी नाळ नसेल तर समस्या कशा सुटणार असे म्हणत अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुंडे, सीईओ डॉ. संजय कोलते, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी कांबळे, काळे, संतोष राऊत आदींसह यावेळी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. |