प्रतिनिधी / उस्मानाबाद -
गुरुवारी (दि.9) मध्यरात्री थेट रेल्वेच थांबवून 7 ते 8 प्रवाशांचे मोबाइल, दागिने असा 3 लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही लूट येडशीजवळ नांदेड ते पनवेल रेल्वेगाडीत घडली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील येडशी रेल्वस्थानकाच्या होम सिग्नलजवळ दि.9 च्या रात्री बारा वाजेच्या सुमारास नांदेड-पनवेल ही रेल्वेगाडी रेड सिग्नल असल्याने थांबली होती. यावेळी चोरट्यांनी रेल्वेच्या बोगीच्या खिडकीतून हात घालत प्रवाशांचे दागिने व इतर सामान असा एकूण सुमारे 3 लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला. धक्कादायक बाब म्हणजे सदरील रेल्वे थांबविण्यासाठी चोरट्यांनी चक्क तेथील सिग्नलचे वायरच तोडून काढल्याने रेड सिग्नल लागले. यामुळे सदरील रेल्वे थांबली असता चोरट्यांनी आपला डाव साधून घेत पळ काढला. यावेळी होत असलेली आरडाओरड आणि बाहेर सर्वत्र असलेला अंधार यामुळे काय सुरू आहे बराच वेळ कोणाच्या लक्षात आले नाही. दरम्यान, यावेळी चोरट्यांनी रेल्वेतील प्रवासी सरिता जगन्नाथ जोशी (वारजे नाका, पुणे) यांचे चोरट्यांनी खिडकीतून हात घालून गळ्यातील 30 ग्रॅम 95 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, पाचशे रुपयांची पर्स व रोख साडे पाच हजार रुपये असा एकुण 1 लाख 1 हजार रुपयांचा ऐवज हिसकावुन नेला. सहप्रवासी नम्रता मनिष भाटीया( रा. पिंपरी, पुणे) यांचे 53 हजार 500 रुपयांचे तीन मोबाईल व पर्समधील 20 हजार रुपये,गिरीजाबाई रोहिदास मुंजाळ (रा. बहिरजी नगर वसमत, जि. हिंगोली) यांच्या गळयातील 30 हजार रुपयांचे मंगळसुत्र, मंजुषा विठ्ठलराव होणशेटवाड (रा. जानकीनगर नांदेड) यांच्या गळयातील 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण, रेश्मा गोकुळसिंग राठोड( रा. पाचुदा, जिल्हा नांदेड) यांच्या गळ्यातील 15 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र,प्रमिला सुर्यकांत चिद्रवार (रा श्रीरामनगर, परभणी) यांच्या गळ्यातील 15 हजार रुपयांचे मंगळसुत्र असा जवळपास 3 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी सरिता जोशी(रा. पुणे) यांच्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दरेकर हे करत आहेत.

 
Top