प्रतिनिधी/तुळजापूर-
तुळजापूर शहरात मोकाट जनावराच्या हल्ल्यात गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान नुकताच मृत्यू झाला. या प्रकरणी पालिकेला जबाबदार धरत नगर पालिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
मागील महिन्यात दि. 5 एप्रिल रोजी सकाळी शहरातील जिजामाता नगर भागात मोकाट जनावरांच्या हल्ल्यात शकुंतला दामोदर भस्मे (65) या वृद्धेच्या पोटात शिंग घुसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना जखमी अवस्थेत तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्या नंतर पुढील उपचाराकरीता सोलापूरला हलविण्यात आले. मात्र तब्बल सव्वा महिन्यानंतर भस्मे यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपुष्टात येऊन दि. 14 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. भस्मे यांच्या मृत्यूला नगर पालिका जबाबदार असून पालिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर तब्बल 115 शहरवासीयांच्या स्वाक्षरी आहेत.

 
Top