प्रतिनिधी/ उस्मानाबाद-
|
लोकसभा निवडणुकीत ओमदादा निवडून येणार की राणादादा, या मुद्द्यांवर १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पैज लावणाऱ्या चार कार्यकर्त्यांच्या हातात बेड्या पडल्या आहेत. मतदारसंघातून कोण निवडून येणार, यावर पैज लावणाऱ्या चौघांविरुध्द सोमवारी (दि.२९) आनंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून,चौघांनाही अटक झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून पुन्हा एकदा निवडणुकीवर चर्चा सुरू झाली आहे. उस्मानाबाद येथे बाजीराव विष्णू करवर (रा.राघुचीवाडी), शंकर विठ्ठल मोरे (रा.राघुचीवाडी), हनुमंत पाराप्पा ननवरे (रा.वाघोली), जिवन अमृतराव शिंदे (रा.घाटंग्री) यांनी उस्मानाबाद कोर्टाच्या बाजूस शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मतदार संघातून कोण निवडूण येणार यावर पैज लावून बेकायदेशीररित्या एकमेकांचे किंमती वस्तूचे आमीष दाखवून दुचाकी (एम.एच. २४ सी. ८८११), टाटा इंडिगो चारचाकी (क्र. एम.एच. २५ पी. ००१०) यावर आरोपींनी पैज लावून जुगार खेळला, असे पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे.या चौघांवर जुगाराचे कलम लावण्यात आले असून, सोमवारी (दि.२९) आनंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. |