उमरगा (माधव सुर्यवंशी)-
तालुक्यात अनेक गावे भीषण पाणी टंचाईला तोंड असली तरी भविष्यात पाणी टंचाईवर कायम स्वरुपी उपाय योजना करण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था अथवा लोकप्रतिनिधी कडून सध्या तरी कोणतेही पाउल उचलले जात नाही. दुसरी कडे मात्र पाण्याचे टॅंकरसह अधिग्रहण प्रस्तावाची प्रशासनाकडे वाढ होत आहे.
उमरगा तालुक्यामध्ये दरवर्षी होणाऱ्या पर्जन्यमानात घट होत चालली आहे. तर अनेक गावांत उन्हाळ्याच्या दिवसात वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असून दररोज अनेक लाकडाचे ट्रक लाकडी कटाई साठी कटाई कारखान्यावर येत असल्याचे दिसते. त्यामुळे तालुक्याची वाळवंटाकडे होणारी वाटचाल थांबवण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था कधीही पुढे येत नाहीत. गत वर्षीच्या पावसाळ्यात तालुक्यातील काही महसूल मंडलात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी अनेक तलाव, विहिरी, हिवाळ्यात च कोरड्या पडल्या आहेत. दर दोन वर्षांनी अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईवर कायम स्वरूपी उपाय योजना होणे आवश्यक आहे. मात्र सततचा दुष्काळ आणि कमी पर्जन्यमान याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधी सामाजिक संस्था किंवा प्रशासनाकडून म्हणावे तसे प्रयत्न दिसून येत नाहीत. पावसाळा आला की वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ असते परंतु लावण्यात आलेली रोपे किती जगली याकडे कुणीही पहात नाही.
तालुक्यातील अनेक गावाना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी गाव पातळीवरील सरपंच, चेरमन, लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जलपुनर्भरण, वृक्षलागवड, जलयुक्त प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे. परंतु हे सर्व उपक्रम उत्सव साजरा केल्या प्रमाणेच राबविले जातात. पाचवीला पुजलेला दुष्काळ पुन्हा निर्माण होणार नाही याची दखल घेऊन उपाय योजना करण्याची गरज आहे.

 
Top