प्रतिनिधी / उस्मानाबाद-
विभागीय आयुक्त केंद्रेकरांच्या दट्ट्याने एमजीपीने उजनी योजनेतील तांत्रिक अडचणी शोधून त्या तातडीने दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळतंय असं दिसताच ६ महिने पाणी प्रश्नी गप्प असलेले नगराध्यक्ष श्रेय घ्यायला सरसावले आहेत. त्यांनी श्रेय घेण्यासाठीच्या गावगप्पा सोडून शहरातील नागरिकांना पाणी केव्हा देणार ते सांगा, असा प्रश्न माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांनी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांना विचारला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उजनी पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक त्रुटी लक्षात आल्यानंतर आणि तेरणा व रुईभर धरणातील पाणीसाठा संपत आला त्यावेळी कोणते नियोजन केले. जर पाण्याचे पर्यायी स्रोत शोधले असते, विंधन विहिरींचे अधिग्रहण करून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला असता तर नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे तो करावा लागला नसता.
उजनी धरणात मुबलक पाणी असताना १५-२० दिवसाला एकदा पाणी मिळत आहे. त्यामुळे विकत पाणी घेऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यापूर्वी दुष्काळी परिस्थिती होती तेंव्हा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबादेत ११० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. बोअरचे अधिग्रहण केले, हे नियोजन आम्ही जेंव्हा केलं ते विद्यमान अध्यक्षांनीही अनुभवलं आहे. परंतु, या साध्या बाबी का केल्या नाहीत? याचे उत्तर त्यांना जनतेला द्यावेच लागेल असे नमूद करून राष्ट्रवादीकडून पालिकेला गेल्या सहा महिन्यांपासून पाणी नियोजनाबाबत वारंवार पत्र देऊन, सभागृहाच्या माध्यमातून पाठपुरावा होत आहे. मात्र कोणतीच हालचाल न केल्याने नागरिकांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. हे पाहून आमदार पाटील यांनी हा प्रश्न विभागीय आयुक्तांकडे नेला. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने बैठक घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना स्वत: लक्ष घालण्यास सांगितले, एमजीपीच्या मुख्य अभियंत्यांना दोन दिवसात पाहणी करून तांत्रिक अडचणी निवारण्याबाबत आदेशीत केले. तेव्हा याबाबत मार्ग निघाला. परंतु, नगराध्यक्षांनी पत्रक काढत श्रेय घेण्यासाठी धडपड सुरू केली आहे असाही टोला पत्रकात लगावला आहे. 
 
Top