प्रतिनिधी/ तुळजापूर-
तुळजाभवानी मंदिरात गोमुख तीर्थानजीक भाविकांचे हरवलेले दिड तोळ्याचे सोन्याचे ब्रासलेट सुरक्षा रक्षकाने प्रामाणिकपणे परत दिले. प्रामाणिकपणाने भारावलेल्या भाविकाने मंदिर संस्थानला एक हजार रुपयांची देणगी दिली.
उन्हाळी सुट्ट्या आणि लगीन सराईच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. रविवारी गर्दीत सकाळी नऊ च्या सुमारास कर्नाटक राज्यातील भालकी (जि. बीदर) येथील भाविक शिवकुमार गुराप्पा शिंदे गोमुख तिर्थात हातपाय धुऊन बाहेर येत हाेते. त्यांचे दिड तोळ्याचे ब्रासलेट हरवले. यावेळी गोमुख तीर्थानजीक ड्युटीवर असलेले सुरक्षारक्षक मारूती अंबादास क्षीरसागर यांना सोन्याचे ब्रासलेट मिळून आले. सुरक्षा रक्षक क्षीरसागर यांनी सोन्याचे ब्रासलेट कंट्रोल रूमला जमा केले. दरम्यान भाविकांशी उध्दटपणे बोलणे, प्रसंगी मारहाण करणे यासह या ना त्या कारणाने सतत चर्चेत असणारे सुरक्षा रक्षक पहिल्यांदाच क्षीरसागर यांच्यामुळे प्रामाणिकतेबद्दल चर्चेत आले. दरम्यान सोन्याचे ब्रासलेट हरवल्याचे लक्षात येताच भाविक शिंदे यांनी गोमुख तीर्थानजिक शोधाशोध सुरू केली. यावेळी उपस्थितांनी भाविक शिंदे यांना सोन्याचे ब्रासलेट सुरक्षा रक्षकाला सापडल्याचे तसेच कंट्रोल रूमला असल्याचे सांगितले. दरम्यान सापडलेले सोन्याचे ब्रासलेट ओळख पटवून भाविकांला देण्यात आले. यावेळी धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांच्यासह सुरक्षा अधिकारी शिवाजी घागरे, शिद्धेश्वर पवार आदींची उपस्थिती होती. सुरक्षारक्षकाचे कौतुक होत आहे. 
 
Top