लोहारा/प्रतिनिधी
पाण्याचा महत्त्वपूर्ण स्रोत असलेल्या ओढे,तलावांच्या संवर्धनासाठी त्यातील गाळ काडून अजुन खोलीकरण करावे या मागणीसाठी लोहारा शहरवाशी आणि आर्ट ऑफ लिव्हिंग, निसर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने लोहारा तहसीलदार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. तहसीलदार विजय अवधाने यांनी तलाव ओढ्याची पाहणी केली यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना माहिती देऊन खोलीकरणाच्या कामाला मंजुरी देऊ असे त्यांनी सांगितले.
    राज्य शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत ठिकठिकाणी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. लोहारा शहरात दोन वर्षापुर्वी लोहारा शहरवासीयांनी लोकवाट्यातुन, आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने साडे तीन किलोमीटर ओढ्याचे खोलीकरणाचे काम केले होते ते काम अर्धवट राहिले आहे. तलावांमध्ये साचलेला गाळ उपसा तसेच शहराभोतालील ओढयाचे खोलीकरण केल्याने त्यावेळेस पडलेल्या पाऊसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी, कुपननलिका यातील पाणीसाठा वाढला होता. तरी आज तागायत लोहारा शहराला पाणी कमी पडले नाही. यावर्षी कमी पावसामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तरी प्रशासनाने शहरालगत असलेले ओढे तलाव याचे खोलीकरण करावे अशी मागणी होत आहे. या निवेदनावर बालाजी मक्तेदार, हाजी बाबा शेख, नगरसेवक श्रीनिवास माळी, विरेश स्वामी, प्राचार्य शाहजी जाधव, वैजिनाथ पाटील, श्रीशैल जट्टे, गणेश हिप्परगेकर, सहदेव काटगावे, शरणाप्पा कबाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top