उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथील 12 शेतक-यांना महावितरणकडून स्वतंत्र विद्युत डीपी मंजूर झालेले आहेत. संबंधित ठेकेदाराकडून कामाचा सर्वेही झालेला आहे. मात्र अद्याप कामास सुरूवात करण्यात आलेली नाही. पावसाळयापूर्वी हे काम सुरू करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी उपकार्यकारी अभियंता बी. व्ही. चाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे. 
निवेदनात म्हटले की, उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथील 12 शेतक-यांना एचयुडी योजनेतंर्गत शेतीसाठी स्वतंत्र विद्युत डीपी मंजूर करण्यात आलेले आहेत. या कामाचा सर्वेही पूर्ण करण्यात आलेला आहे. संबंधित ठेकेदाराला हे काम देण्यात आलेले आहे. मात्र याला अनेक महिन्यांचा कालावधी लोटला तरी एकाही शेतक-यांच्या शेतात विद्युत डीपी उभारण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे इतर 5 ते 6 गावात विद्युत डीपी बसविण्याची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. सध्या पावसाळा तोंडावर असल्याने ही कामे तात्काळ सुरू होणे गरजेचे आहे. पावसाळा सुरू झाल्यास ही कामे करण्यास मोठ्या अडचणी येणार आहेत. तसेच विद्युत डीपी नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे महावितरण कार्यालयाने संबंधित ठेकेदाराला तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा शेतक-यांना सोबत घेवून आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. 

 
Top