प्रतिनिधी/उस्मानाबाद-
तुळजाभवानी देवीच्या धार्मिक व्यवस्थापक पदाचा पदभार देताना अनेक मौल्यवान व ऐतिहासिक दागिने चार्जपट्टीवर न आल्याने याप्रकरणी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी तक्रार केली होती. या अनुशंगाने जिल्हाधिकारी यांनी द्विसदस्यीय समितीची चौकशीसाठी नियुक्ती केली आहे. परंतु, यामध्ये मंदिर देवस्थानचे विश्वस्त असलेल्या चेतन गिरासे यांच्या नियुक्तीला तक्रादाराच्यावतीने अॅड. शिरीष कुलकर्णी यांनी आक्षेप नोंदविला असून ज्या ट्रस्टच्या कारभाराविरोधात ही तक्रार आहे त्याचाच सदस्य चौकशी समितीत असणे हे नैसर्गिक न्यायाला धरून नसल्याचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच चौकशी समितीलाही दिले आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजाभवानी देवीच्या दागिने गहाळ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी निकम बाफना व उपविभागीय अधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त चेतन गिरासे यांची नियुक्ती केली आहे. परंतु, यातील गिरासे यांच्या नियुक्तीला तक्रारदार गंगणे यांनी विधिज्ञ अॅड. कुलकर्णी यांच्यामार्फत आक्षेप नोंदविला आहे. यामध्ये गिरासे हे मंदिराचे विश्वस्त म्हणजेच मंदिराशी निगडीत व्यक्ती आहेत. याप्रकरणात मंदिर व्यवस्थापनाच्या गलथानपणाबाबतच तक्रार असल्याने कायद्याच्या चौकटीत त्याच मंदिर विश्वस्तांच्या सदस्यांकडून योग्य प्रकारे न्यायदान होणार नाही. त्यामुळे त्यांनी केलेली चौकशी बेकायदेशीर ठरेल तरी या समितीतून त्यांना वगळून इतर कोणताही उच्च पदस्थ अधिकारी नेमावा, सदरील समिती दोन ऐवजी तीन सदस्यांची करावी. या प्रकरणाची व्याप्ती तसेच गंभीरता पाहता सहाय्यक धर्मादाय आयुक्त किंवा त्यांच्या प्रतिनिधींना या समितीत घ्यावे कारण मंदिर संस्थानच्या मालमत्तेचे ते रखवालदार आहेत असेही निवेदनात नमूद केले आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी याचा विचार करून गिरासे यांना समितीतून वगळून दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी व समिती तीन सदस्यीय करून सह धर्मादाय आयुक्तांना यामध्ये घ्यावे अशी मागणी किशोर गंगणे यांच्या वतीने अॅड. शिरीष कुलकर्णी यांनी केली आहे. त्यामुळे याप्रकरणी जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी मुधोळ यांनी घेतली माहिती दरम्यान, ७१ मौल्यवान नाणी गायब झाल्या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानच्या अध्यक्षा दिपा मुधोळ-मुंडे यांनी बुधवारी (दि.१५) तुळजाभवानी मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून रेकॉर्डसह इतर माहिती घेतली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी यांनी तुळजापूर विकास प्राधिकरणातून बांधण्यात आलेल्या १०८ भक्त निवासलाही भेट दिली. |
