उस्मानाबाद/प्रतिनिधी- 
टेलरिंगच्या दुकानास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून शिलाई मशिन, रॅक, कपडे, साड्या, ब्लाऊज असे सुमारे दीड लाख रूपये किंमतीचे साहित्य खाक झाले. शहरातील तांबरी विभागातील हॉटेल अंबालानजीक झालेल्या  या दुर्घटनेत सामान्य व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 
उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी (आ) येथील तानाजी आडसुळे यांचे तांबरी विभागात अवंतिका लेडीज टेलर हे दुकान आहे. 7 एप्रिलच्या पहाटे या दुकानास अचानक आग लागली. या आगीत दुकानातील शिलाई मशिनसह टेबल, खुर्च्या, ग्राहकांनी शिलाईसाठी दिलेले कपडे, साड्या, ब्लाऊज व इतर साहित्य खाक झाले. दरम्यान, घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. शॉर्टसर्किटमुळे झालेल्या या दुर्घटनेत सुमारे दीड लाख रूपयाचे नुकसान झाल्याचे व्यावसायिक आडसुळे यांनी सांगितले. 
 
Top