प्रतिनिधी /उस्मानाबाद
|
शहरातील प्रतिथयश ग्रीनलँड व अभिनव इंग्लिश स्कूलची मान्यता रद्द केल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांना कोणत्या शाळेत समायोजित करावे, अशी विचारणा शिक्षण उपसंचालक संजय यादगिरे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना केली आहे. शैक्षणिक साहित्यांसाठी अधिक रक्कम उकळली गेल्याचा आरोप करत ग्रीनलँड व अभिनव स्कूलच्या विरोधात मनसेचेे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर शिक्षण विभगाकडे या दोन्ही शाळांची मान्यता काढून घेण्याबाबतची मागणीही करण्यात आली. यामध्ये सुनावणी झाल्यानंतर मान्यता काढण्याबाबतच्या अंतिम निर्णयासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांकडे पाठवला हाेता. त्यानुसार ११ जानेवारी व १५ मार्च रोजी यासंदर्भात सुनावणी घेण्यात आली. मान्यतेचा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. जिल्हा सचिव कांबळे यांनी थेट उपसंचालक कार्यालयात आंदेालन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पुन्हा या संचिकेच्या प्रक्रियेला वेग आला आहे. निर्णय प्रलंबित असतानाही या दोन्ही शाळेच्या मान्यता काढून टाकण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांचे अन्य कोणत्या शाळेत समायोजन करता येईल, अशी विचारणा करून शिक्षणाधिकाऱ्यांचा अभिप्राय मागवण्यात आला आहे. यादगिरे यांनी तातडीने अभिप्राय देण्याची मागणी पत्रात केली आहे. जेणे करून पुढील कारवाई करणे सोईचे जाईल, असेही पत्रात म्हटले आहे. दरम्यान या पत्रांमुळे दोन्ही शाळांची मान्यता काढली जाण्याची चर्चा शहरात आहे. अभिप्रायासाठी दोनी दिवसांची मुदत आहे. मुदतीत अभिप्राय न सादर केल्यास शिक्षण विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कांबळे यांनी दिला आहे. लातूरच्या उपसंचालकांची पत्राद्वारे विचारणा |