प्रतिनिधी/उस्मानाबाद-
|
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचार खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने तयार केलेल्या खर्च नियंत्रण विभागाकडे सर्व १४ उमेदवारांनी आपला निवडणुकीतला खर्च सादर केला असून, या खर्चानुसार सर्व उमेदवारांनी मिळून ८५ लाख, ९९ हजार, ४१७ रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक खर्च शिवसेनेचे उमेदवार ओमराजे यांनी ३५ लाख, ६३ हजार, २४१ रुपये तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे उमेदवार राणा पाटील यांनी ३३ लाख, २५ हजार, ६३३ रुपये खर्च केल्याचे निवडणूक विभागाला कळविले आहे. वंचितचे उमेदवार अर्जुन सलगर यांचे ८ लाख ६६ हजार ४३५ रुपये खर्च झाले आहेत. काही अपक्ष उमेदवारांनीही लाखापेक्षा अधिक रक्कम खर्च केल्याचे दाखविले आहे. वास्तविक, निवडणूक विभागाला सादर केलेल्या आणि प्रत्यक्षातील खर्चामध्ये मोठी तफावत अाहे. भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारादरम्यान झालेल्या निवडणूक खर्चाच्या लेख्याची तृतीय तपासणी निवडणूक निरीक्षक (खर्च संनियंत्रण) पी.सुधाकर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. त्यानुसार मतदारसंघातील राजकीय पक्ष व पात्र उमेदवार यांनी निवडणुकीदरम्यान केलेल्या खर्चाचे लेखे जिल्हा खर्च नियंत्रण कक्षात सादर करण्यात आले आहेत. सादर केलेल्या उमेदवारनिहाय निवडणूक खर्चानुसार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (पक्ष-शिवसेना) ३५ लाख ६३ हजार २४१, राणाजगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) ३३ लाख २५ हजार ६३३, डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन (बहुजन समाज पार्टी) ६६ हजार ९४०, अर्जुन सिद्राम सलगर (वंचित बहुजन आघाडी) ८ लाख ६६ हजार ४३५, अाण्णासाहेब रामचंद्र राठोड (भारतीय बहुजन क्रांती दल) ९३ हजार ७०८, दीपक महादेव ताटे (भा.प.सेना पार्टी) १ लाख ३४ हजार ६६८, विश्वनाथ सदाशिव फुलसुरे (क्रांतिकारी जय हिंद सेना) १ लाख २ हजार ५४१, आर्यनराजे किसनराव शिंदे (अपक्ष) १८ हजार ३८०, नेताजी नागनाथराव गोरे (अपक्ष) १ लाख २७ हजार ८५५, जगन्नाथ निवृत्ती मुंडे (अपक्ष) १ लाख ६० हजार २३५, तुकाराम दासराव गंगावणे (अपक्ष) ३७ हजार ४००, डॉ.श्री.वसंत रघुनाथ मुंडे (अपक्ष) १ लाख ८६ हजार १०, शंकर पांडुरंग गायकवाड (अपक्ष) ६४ हजार ५११, सय्यद सुलतान लाडखाँ (अपक्ष) यांचे २९ हजार २५७ रुपये खर्च झाले आहेत. निवडणुकीत झालेला खर्च तपासणीसाठी सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक, जिल्हा खर्च नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या तपासणी बैठकीस खर्च नियंत्रण कक्षाचे नोडल ऑफिसर शेखर शेटे, सहाय्यक नोडल ऑफिसर किरण घोटकर, संपर्क अधिकारी सचिन कवठे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. अपक्ष उमेदवारांचा खर्च १८ हजार काही अपक्ष उमेदवारांनी लाखावर खर्च झाल्याचे दाखविले असले तरी आर्यनराजे किसनराव शिंदे यांचा मात्र केवळ १८ हजार ३८० रुपये इतका म्हणजे सर्वात कमी खर्च झाला आहे. लोकसभेच्या उमेदवारांना ७० लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली होती. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक विभाग तत्पर असला तरी अप्रत्यक्ष होणारा खर्च आणि दाखविण्यात आलेल्या खर्चामध्ये मोठ तफावत असल्याने खर्चामध्ये विसंगती आहे. एकीकडे निवडणुकीत कोटींमध्ये खर्च केला जात असताना प्रत्यक्षात मात्र अत्यंत कमी खर्च दाखविला जात असल्याचे समोर येत आहे. |