प्रतिनिधी / उस्मानाबाद
|
आबुधाबी येथे पार पडलेल्या १५ व्या आंतरराष्ट्रीय स्पेशल ऑलिंपिक वर्ल्ड समर गेममध्ये भारतीय टीमने ३६८ पदके मिळवून पदकांच्या यादीत तिसरे स्थान मिळविले. यामध्ये जिल्ह्यातील कोळेवाडी येथील आकाश तुकाराम आकोसकर या दिव्यांग (गतिमंद व मूकबधीर) खेळाडूने टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात पुरूष एकेरी सुवर्ण व पुरूष दुहेरी गटात सुवर्ण पदक अशा दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. या कामगिरीबाबत आकाशचा सत्कार जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी केला. यावेळी जिल्हाधिकारी मुंडे यांनी मनोगत व्यक्त करताना अगदी कठीण परिस्थितीतून आकाशने हे सूवर्णपदक मिळविल्याबद्दल त्याचे विशेष अभिनंदन केले. यातच नीट ऐकताही येत नसलेल्या गतिमंद व मतिमंद आकाश आकोसकरने मिळविलेली ही दोन सूवर्णपदके जिल्ह्यासाठी,राज्यासाठी आणि देशासाठीही निश्चितच गौरवास्पद असल्याचे सांगितले. या स्पर्धेत एकूण १९२ देशामधून भारतीय संघात २८४ स्पर्धक व ७१ प्रशिक्षक उपस्थित होते. ग्रामीण भागातील कोळेवाडीच्या आकाश आकोसकर या दिव्यांग खेळाडूने टेबल टेनिस खेळात भारताची मान उंचावण्याची विशेष अशी कामगिरी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक)डॉ. प्रताप काळे, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडीक,सहाय्यक क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे उपस्थित होते. |