उमरगा /प्रतिनिधी-
 पोलिसांच्या मारहाणीत तलमोड गावातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनमसमोर गुरुवारी पहाटेपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
उमरगा तालुक्यातील तलमोडजवळ 21 एप्रिल रोजी सायंकाळी एका कारचे टायर फुटून कार खड्ड्यात पडून पेट घेतल्याने तिघांचा होरपळून मृत्यू झाला होता, यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी उमरगा पोलीस स्टेशनला आणि अग्निशामक दलाला कळवले असता, पोलीस वेळेवर आले नाहीत, तसेच अग्निशामक दलाची गाडीही वेळेवर आली नाही, जेव्हा पोलीस व अग्निशामक गाडी आली तेव्हा संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक केली होती, त्यात दोन पोलीस किरकोळ जखमी झाले होते.तसेच पोलीस गाडीची काच फुटली होती.याप्रकरणी 10 ते 12 जणांनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर बुधवारी रात्री काही पोलीस धरपकड करण्यासाठी तलमोड गावात गेले आणि काही तरुणांना ताब्यात घेतले, यावेळी काही निरपराध लोकांना मारहाण केली, त्यात दत्तू गणपती मोरे, वय 70 या  शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे गावात संतप्त वातावरण तयार झाले आहे.
या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि दोषी पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थ उमरगा पोलीस स्टेशनसमोर गुरुवारी पहाटेपासून ठिय्या मांडून बसले आहेत.त्यामुळे उमरगा शहर आणि तालुक्यात संतप्त वातावरण पसरले आहे.
नेमके काय घडले ?
 रविवारी ( दि. 21 ) दुपारी चारच्या सुमारास कराळी पाटीजवळ झालेल्या अपघातात कारने पेट घेतल्याने तिघांचा होरपळून मृत्यू झाला होता. या दुर्देवी घटनेदरम्यान पोलिस प्रशासन व अग्नीशमन गाडी वेळेत पोहचली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली होती. या प्रकरणी पोलिस प्रशासनाने तलमोडच्या १५ ते २० लोकांवर गुन्हे दाखल केले होते.
या  प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस उपनिरिक्षक सुभाष माने, हवालदार पी. डी. गवळी यांच्यासह सात ते आठ कर्मचारी बुधवारी मध्यरात्री तलमोड गावात पोहचले. मुकेश  मोरे या तरुणाला ताब्यात घेताना त्याचा आजोबा दतु गणपती मोरे (वय 58) या वृध्दाने आमच्या पोरान काय केलयं, त्याला कशाला घेऊन जाता असे विचारले असता पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृद्धाला धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थ व त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
वृध्दाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मध्यरात्रीपासूनच गावं जागी झाला आणि पोलिसाच्या दडपशाहीच्या विरोधात एकत्र आला. पहाटे पाचच्या सुमारास दत्तू मोरे यांचा मृतदेह उमरगा पोलिस ठाण्याच्या आवारातील कट्यावर ठेवला. पोलिसांच्या मारहाणीमुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.या घटनेला जबाबदार असणाऱ्या पोलिस अधिकारी व संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती. सकाळी साडेआठपर्यंत ग्रामस्थ पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून होते.अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी उमरगा पोलीस ठाण्यात जमलेल्या तलमोड नगरीकांची भेट घेतली. तलमोड येथील मयत दत्तु मोरे ( वय ७०) यांच्या मृत्युस कारणीभुत असणाऱ्यांची चौकशी करू व दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी नागरीकांना दिले. त्यानंतर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेल्या मृतदेहास शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात आले.
 
Top