प्रतिनिधी /उमरगा
|
जन्मदात्या पित्यानेच पाच महिन्याच्या मुलाचा गळा दाबून खुन केल्याचा संशय व्यक्त होत असून या घटनेनंतर पिता पोलिस ठाण्यात हजर झाल्याने हा प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.११) मध्यरात्रीनंतर उमरगा तालुक्यातील तुरोरी गावात घडली असून याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, तुरोरी येथील बालाजी जनार्दन गायकवाड (५०) हा बस आगारात चालक अाहे. त्याला दोन पत्नी असल्याचे ग्रामस्थांकडून समजले. यातील पहिल्या पत्नीशी जमत नसल्याने ती आपल्या मुलांसह पुणे येथे वास्तव्यास असून बालाजीने नात्यातीलच एका मुलीशी दुसरे लग्न केले होते. दुसऱ्या पत्नीने पाच महिन्यापूर्वी मुलास जन्म दिला. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री दोघांत भांडण झाल्याचेही कळते. याच रागाच्या भरात बालाजीने आपल्या चिमुकल्या मुलाचा गळा आवळून खून केल्याचा संशय आहे. स्वत: बालाजी गायकवाड सकाळी आठच्या सुमारास पोलिस ठाण्यात हजर झाला. ताब्यात घेतलेल्या बालाजी गायकवाडकडे या प्रकरणाची दिवसभर चौकशी सुरू होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून चिमुकल्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार चिमुकल्याच्या गळ्यावर व्रण असल्याचे समजते. पोलिस यंत्रणेकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. |