आलूर/प्रतिनिधी- 
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांनी एकत्रित येवून आघाडी सरकारच्या काळात सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून विकास केला जात होता. मात्र युती सरकारच्या काळात उद्योजकांना केंद्रबिंदू मानण्यात आले. परिणामी सर्वसामान्यांचा विकास होण्याऐवजी त्यांची लूट झाली. विकासाची दृष्टी केवळ आघाडीकडेच आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रतोद तथा औशाचे आमदार बसवराज पाटील यांनी व्यक्त केले. 
संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार बसवराज पाटील यांची उमरगा तालुक्यातील आलूर येथे गुरूवारी सभा झाली. या सभेस जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते शरण पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, काँग्रेसचे सरचिटणीस रामकृष्णपंत खरोसेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, दिलीप भालेराव, प्रशांत पाटील, शिरीष पाटील, महंतय्या स्वामी, राजू माने, गुलाब राठोड, प्रमोद कुलकर्णी, नागण्णा ब्याळीकुळे, लक्ष्मण मुनाळे, गजानंद घुरघुरे, महानंद कलशेट्टी, विद्यासागर व्हट्टे, डॉ. धनाय्या स्वामी, प्रकाश वाकडे, गुरबसय्या स्वामी, शंकर बिराडे, शेखर कांबळे, उमेश कारभारी, शब्बीर नदाफ, सौदागर परवेझ, राजेंद्र बिराडे, सिद्धाप्पा ब्याळीकुळे, राम ओमशेट्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
तत्पूर्वी गावातून प्रचारफेरी काढण्यात आली. महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य मित्र पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आलूरसह परिसरातील विविध गावांत प्रचारफेर्‍या काढून प्रचारपत्रके मतदारांना वाटण्यात आली. गुरूवारी सायंकाळी आलूर येथे आमदार बसवराज पाटील यांनी सभेत, मोठा भाऊ मानून राणाजगजितसिंह पाटील यांच्या विजयासाठी आलूरसह परिसरातील मोठे मताधिक्य दिले पाहिजे, असे भावनिक आवाहन उपस्थितांसमोर केले. यावेळी आलूरसह परिसरातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top