प्रतिनिधी /उस्मानाबाद
लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेची ९५ टक्के तयारी पूर्ण झाली असून, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, विविध राजकीय पक्षाच्या प्रतििनधींना प्रात्यक्षिक दाखवणे आदी कार्यक्रम येणाऱ्या काही दिवसांत पूर्ण होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुंढे यांनी दिली. २७ मार्चपर्यंत वाढलेल्या मतदारानुसार आता लोकसभेसाठी १८ लाख, ८६ हजार २३८ मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतात. तर निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण ९ हजार ४५३ कर्मचाऱ्यांची गरज असेल, असेही त्यांनी सांगितले. 
उस्मानाबाद लोकसभेसाठी १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाची नेमकी तयारी किती झाली आहे, हे संागण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुंढे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. काळे यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी खंदारे, निवडणूक खर्च निरीक्षक सुधाकर नाईक आदी उपस्थित होते. 
बोलताना मुंढे म्हणाल्या, वाढलेल्या मतदारसंख्येनुसार प्रशासनाने तयारी केली असून, त्यासाठी २ हजार ११४ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. औसा विधानसभा मतदारसंघात ३०४, उमरगामध्ये ३१५, तुळजापूरमध्ये ४००, उस्मानाबादमध्ये ४०७, परंड्यात ३६९ आणि बार्शी विधानसभा मतदारसंघात ३१९ मतदानकेंद्र असतील. २७ मार्चच्या मतदारनोंदणीनुसार मतदारसंघात १८ लाख, ८६ हजार २३८ मतदारसंख्या असून, त्यात पुरुष १० लाख, ९०७ तर महिला मतदार ८ लाख, ८५ हजार ३०८ असतील. इतर मतदारांची संख्या १४ आहे. निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार यावर्षी १४ सखी व ५ दिव्यांग मतदानकेंद्राची तयारी केली आहे. प्रक्रियेसाठी ९ हजार ४५३ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, २२८ बस, २१४ जीपचा वापर करण्यात येणार आहे.२१४ झोन तयार करण्यात आले आहेत. ३४ मतदानकेंद्र संवेदनशिल असून, या भागात अितरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात असेल. ११ हजार ५०० कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान असून, फॉर्म १२ भरून घेण्यात येत आहे. 
दिव्यांगांची विशेष सोय निवडणूक विभागाने या वेळी १४ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला असून, हे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून मतदानकेंद्रावर भूमिका पार पाडतील. दिव्यांग व्यक्तींना मदत करणे, महिला, वयोवृद्धांना आवश्यकतेनुसार मदत करणे, अशी कामे विद्यार्थी करतील. निवडणूक विभागाने दिव्यांगासाठी व्हील चेअर तसेच अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीत मतदान प्रक्रियेची सोय केली असल्याचे मुंढे यांनी संागितले. 
 
Top